वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरातील लॉकडाऊनमुळे शेतीमालाच्या वाहतुकीत अडथळे येत आहे. कृषी आणि बागायती उत्पादनाच्या प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राने शेतकरीस्नेही मोबाईल अॅप सुरू केले आहे.
त्याचे अनावरण केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषिभवन इथे केले. शेतातून बाजारापर्यंत, शेतकरी उत्पादक संस्था संकलन केंद्रापर्यंत आणि गोदामापर्यंत शेतमालाची वाहतूक ही प्राथमिक वाहतुकीत समाविष्ट आहे. द्वितीय स्तरावरील वाहतुकीत बाजारातून शेतमालाची राज्यांतर्गत किंवा आंतरराज्यातील बाजारपेठेत, प्रक्रिया केंद्रात, रेल्वे स्थानकात, गोदामात आणि घाऊक व्यापाऱ्यांकडे वाहतूक सुरळित होईल.
शेतकरी आणि व्यापाऱ्यांना शेतातून बाजारापर्यंत आणि देशातील एका बाजारपेठेतून दुसऱ्या बाजारपेठेत शेतमालाची वाहतूक करणे सोपे होईल असे तोमर यांनी सांगितले.