विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक ‘गदिमा’ उर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांची ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी मैत्री. चव्हाणांच्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही माडगूळकर यांच्याशी सलगी झाली. या ज्येष्ठ कविराज गदिमांची आठवण रामनवमीच्या निमित्ताने पवारांना आली. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार गदिमांच्या गीतरामायणाचा आस्वाद घेत आहेत.
”आजचा दिवस रामनवमीचा. देशाच्या अनेक भागात रामजन्माचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो. दुुर्दैवाने कोरोनाचं संकट आलं आणि या संकटात अनेक प्रकारची पथ्यं पाळावी लागतात. त्यामुळं सोहळ्याचं स्वरुप आणणं शक्य नाही. पण घरात बसून आज सगळेजण श्रीरामाचं स्मरण करत असतील या बद्दल माझ्या मनात शंका नाही. आजची रामनवमी हा आगळावेगळा योगायोग. आज तारीख दोन एप्रिल आणि एक एप्रिल 1955 साली गीतरामायणाची सुरुवात झाली. पुण्याच्या आकाशवाणी केंद्रात त्यावेळी सीताकांत लाड म्हणून स्टेशन डायरेक्टर होते. त्यांनी पुढाकार घेतला आणि रामायणावर गीत लिहून ते प्रसारीत करण्याच संकल्प केला. गीतरामायणातलं पहिलं गीत ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’, हे आकाशवाणी पुण्यानं प्रसिद्ध केलं. पुढं 56 गीतं प्रसिद्ध झाली ती अजरामर झाली. याचं गदिमांन श्रेय द्यावे लागेल,” गुरुवारी (दि. 2) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वतः पवारांनीच गदिमा आणि गीतरामायणाबद्दलचं मनोगत व्यक्त केले.
पवार म्हणाले की, गीतरामायणाचं लेखन, त्यासाठी अचूक निवडलेले शब्द हे सगळं अलौकीक आहे. हे लिहिणाऱ्या गदिमांची पार्श्वभूमी काय…तर मिरजेहून पंढरपुरला जात असताना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर, सांगोल्याच्या अलिकडे एक टेकडी आहे. त्या टेकडीवर पत्र्याचं घर आहे. बामनाचा पत्रा म्हणून त्याला ओळखतात. माडगुळकर कुटुंबियांचं हे निवासस्थान. गदिमांचं गाव माडगुळ. तिथून ते औंधला गेले. तिथं शिक्षण घेतलं. पुण्याला आले. गदिमा उच्च विद्याविभूषित नव्हते. परंतु, अतिशय उत्तम साहित्यिक म्हणून संबंध देशात त्यांचा नावलौकिक झाला. गीतरामायण अजरामर झाले. त्यात गदिमांची शब्दरचना ही जशी महत्वाची. तशी सुधीर फडके उर्फ बाबुजी यांनी भारतीय रागांवर आधारीत संगीत देऊन केलेले गायनही महत्वाचे. प्रभाकर जोग आणि त्यांच्या वाद्यवृंदानं त्याला साथ दिली. गीतरामायण अजरामर झालं. त्यांचं स्मरण करण्याचा कालचा-आजचा दिवस आहे.
कदाचित लॉकडाऊन वाढेल का याची चिंता पवारांनी व्यक्त केली. मी कालपासून गीतरामायण ऐकतोय. असं उत्कृष्ट संगीत, काव्य ऐकल्यांतर मनाला समाधान मिळतं. जे-जे आवडीचं असेल ते ऐकत रहा. नव्या पिढीला सुचवेन की वाचन संस्कृती जतन करण्यासाठी काही करता आलं तर करा. मराठीत विपूल साहित्य आहे. छत्रपतींचं जीवनदर्शन, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शेतीविषयक, साहित्य वाचा. बाबासाहेब आंबेडकरांचं लेखन, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण हे वाचा. वैज्ञानिक दृष्टीकोन मजबूत होईल असे लेखन वाचा. व्यक्तीगत ज्ञानवृद्धी करा. वाचत रहा. ज्ञान संपादन करत रहा. सुसंवाद ठेवा. सुट्टीच्या काळाचा आस्वाद व्यक्तीमत्व घडवण्यासाठी करा, असा सल्ला पवारांनी दिला.