विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली / कोलकाता : बंगालमधील विशिष्ट भागात लॉकडाऊनचे बिनदिक्कत उल्लंघन सुरू आहे. कठोर उपाययोजना करून ते रोखा, असा गंभीर इशारा केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारला दिला आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांना लिहिलेल्या पत्रात बंगाल सरकारच्या त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. कोविड १९ फैलाव रोखण्यासाठी बंगाल सरकार काय करत आहे? राज्यात लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना चाचण्या अत्यंत कमी झाल्या आहेत.
कोलकाता शहरात आणि हावडा भागात विशिष्ट समूदायाकडून लॉकडाऊनचे बिनदिक्कत उल्लंघन होत आहे. बाजार अनिर्बंध खुले आहेत. लोकांच्या येण्याजाण्यावर कोणतीही बंधने नाहीत. काही ठिकाणी तर लोक रस्त्यांवर क्रिकेट खेळत आहेत. केंद्रीय समितीला हे आढळून आले आहे. हे चालवून घेता कामा नये. संबंधित परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा, असा गंभीर इशारा या पत्रात देण्यात आला आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात लोकांचा अनिर्बंध वावर, नदीत आंघोळी, क्रिकेट, फुटबॉल सामने असले समूदाय संक्रमणाला कारणीभूत ठरणारे प्रकार आढळले आहेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याच बरेबर राज्यात मेडिकल स्टाफच्या सुविधांची अवस्था दयनीय आहे. कोरोना वॉर्डांची संख्या, आयसीयू वॉर्डांची संख्या पुरेशी नाही. ते पूर्ण करण्याची तयारी देखील केंद्रीय पथकाला दिसली नाही, असेही पत्रात म्हटले आहे.
केंद्रीय पथकाने नोंदविलेल्या निरीक्षणाच्या विपरित राज्य सरकारचा दावा आहे. आशा कर्मचाऱ्यांनी सहा कोटी घरांचे सर्वेक्षण केल्याचा दावा राज्याचे गृहसचिव अल्पन बंदोपाध्याय यांनी केला आहे, तर केंद्राने राज्यांना मदत करावी. त्यांच्यातील उणिवा सांगू नयेत. राज्यांमधील परिस्थिती राज्य सरकारेच पाहून घेतील, असे वक्तव्य बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांनी केले.