विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोविड १९ च्या मुकाबल्यासाठी विकसनशील आणि अविकसित देशांना थेट आर्थिक मदतीचे सूतोवाच आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाने केले आहे. या कोषातील निधीचा वापर वैद्यकीय सुविधा वाढविणे, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता वाढविणे यासाठी करण्याच्या सक्त सूचनांसह ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. कोरोनामुळे जगभरात २१ हजार २९३ जणांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा WHO च्या हवाल्याने जारी केला आहे. परंतु, उपचारानंतर बरे झाल्याच्या रुग्णांची संख्याही अधिक लक्षणीय आहे. भारतात ६२९ जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, भारतात अजूनपर्यंत कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशम झालेले नाही, अशी दिलासादायक माहिती भारताचे आरोग्य सचिव लव आगरवाल यांनी दिली आहे. जगभरात लॉकडाऊन असले तरी वैद्यकीय उपकरणांची वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या सूचना आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाने दिल्या आहेत. वैद्यकीय उपकरणांच्या आयातीची बिले तातडीने मंजूर करण्यात येतील, असे सूतोवाचही कोषाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.