विशेष प्रतिनिधी
पुणे : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांकडून त्याचा फज्जा उडणे, विनाकारण फिरत राहणे यामुळे प्रशासनावरचा ताण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये लॉकडाऊनचे पालन व्हावे आणि वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. श्री. पाटील यांनी कोथरुड मधील सोसायट्यांमध्ये पुस्तकांचे वाटप केले आहे.
सध्या पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच अनेक भागांत लॉकडाऊनचा फज्जा उडताना दिसत आहे. तसेच तरुण वर्ग विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत. तर अनेक ठिकाणी सोसायटीच्या आवारात विरंगुळ्यासाठी गर्दी करत आहेत.
त्यामुळे संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेत, आपल्या मतदारसंघात पुस्तकांचे वाटप केले आहे. मतदारसंघातील अनेक सोसायट्यांमध्ये पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.
यासोबतच लॉकडाऊननंतर अडचणीत असलेल्यांसाठी भोजन व्यवस्था केली आहे. तसेच गरजू कुटुंबांना शिधा वाटप आणि वयोवृद्ध व्यक्तींना २५ टक्के सवलतीच्या दरात औषधे घरपोच देण्यात येत आहे. त्याचबरोबर पुण्यातील कोरोनाबाधितांची सेवा करणार्या डॉक्टर, परिणाम यांना स्वसंरक्षणासाठी पीपीई किटचे वाटप देखील करण्यात आले आहे.