विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बांगला देशाचे निर्माते आणि पहिले अध्यक्ष वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांची १९७५ मध्ये गोळ्या घालून हत्या करणारा रिसालदार मुसलेमुद्दीन याला पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली. त्याच्या अटकेमुळे वंगबंधू हत्याकांडातील सर्वांत मोठा आरोपी पकडला गेला आहे.
मुसलेमुद्दीन हा डॉ. समीर दत्त हे हिंदू नाव धारण करून गेल्या २० वर्षांपासून २४ परगणा जिल्ह्यात युनानी दवाखाना चालवत होता. त्याने बनावट भारतीय कागदपत्रे तयार करून तेथे घर विकत घेतले होते. वंगबंधू हत्याकांडातील एक प्रमुख आरोपी माजेद याने दिलेल्या माहितीच्या आधारे मुसलेमुद्दीन याला अटक करण्यात आली. माजेदला काही महिन्यांपूर्वी कोलकात्यातून अटक केली होती. बांगलादेशात त्याच्यावर खटला चालवून १० दिवसांपूर्वीच फाशी देण्यात आले आहे. माजेद ७३ वर्षांचा होता. तो २० वर्षांपासून कोलकत्यात राहात होता. त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड सगळे होते. त्याची पत्नी ४२ वर्षांची आहे.
मुसलेमुद्दीनला पकडण्याची कामगिरी एनआयएने अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली. पश्चिम बंगाल पोलिसांना या ऑपरेशनचा सुगावा देखील लागला नाही. रॉ, एनआयए आणि बांगला देशाची गुप्तहेर एजन्सी यांनी एकत्रितपणे हे ऑपरेशन केले.
१५ ऑगस्ट १९७५ रोजी बांगलादेश लष्करातील काही अधिकाऱ्यांनी बंड करून वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांची अध्यक्षीय प्रासादात घुसून संपूर्ण कुटुंबासह हत्या केली. त्यावेळी त्यांच्या कन्या सध्याच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद या त्यांच्या बहिणीसह जर्मनीत होत्या. त्यामुळे त्या भीषण हत्याकांडातून वाचल्या.
बंडानंतर आलेल्या सरकारांनी बंडखोर सैनिकांना माफी दिली. हत्याकांडात सामील असलेले ५ अधिकारी पळून गेले. त्यातील ४ अधिकारी सापडले. त़्यांना बांगलादेशात खटला चालवून फाशी देण्यात आले. रिसालदार मुसलेमुद्दीन हा शेवटचा अधिकारी पकडला आहे.
माजेद आणि मुसलेमुद्दीन २० वर्षांहून अधिक काळ पश्चिम बंगालमध्ये राहिले. यातून कम्युनिस्ट आणि ममता सरकारांचे ढिलाईचे धोरण उघड झाले. पश्चिम बंगाल हे इस्लामी दहशतवाद्यांसाठी सुरक्षित अड्डा बनला. बांगला देशाच्या निर्मात्याचे खुनी ममतांच्या राज्यात सुखाने राहात होते, हे या निमित्ताने उघड झाले.