ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांच्या बाबतीत मालकांनी माणुसकीने वागून त्यांना किमान वेतन द्यावं, अशी विनंती अर्थमंत्री अजित पवार यांनी खाजगी कंपन्यांना केली आहे. यामागची अजित पवारांची भावना चांगली असली तरी स्वतः ज्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, त्याच सरकारने अंगणवाडी सेविकांसह अनेक सरकारशी निगडीत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांचा सल्ला लोका सांगे ब्रह्मज्ञान…असा वाटला तर त्यात अतिशयोक्ती नाही.
विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांच्या बाबतीत कंपनी मालकांनी माणुसकीने वागून त्यांना किमान वेतन द्यावं अशी विनंती महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र, चीनी व्हायरसविरोधातील लढाईत वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या अंगणवाडी ताईंना मात्र मानधनाविनाच ठेवले आहे. अंगणवाडी ताईंचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन राज्य सरकारने अद्याप दिलेले नाही.
चीनी व्हायरविरोधातील लढाईत सर्वेक्षणाचे काम महत्वाचे आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडी ताई ते करत आहेत. पुण्यासारख्या शहरात चीनी व्हायरसचे हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी सर्वेक्षणाला जात आहे. मात्र दुसऱ्याला उपदेश करणाऱ्या अर्थमंत्री अजित पवार यांना स्वत:च्याच विभागाकडून हे वेतन काढण्यास अद्याप वेळ मिळालेला नाही.
कोरोना विषयक सर्व्हे, लोकशिक्षण, सल्ला इत्यादी महत्वपूर्ण काम अंगणवाडी ताईंना करावे लागत आहे. कोरोनाशी संबंधित उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व सहायक कर्मचारी, आशा वर्कर यांना 50 लाखाचे सुरक्षा कवच जाहीर झाले आहे. पण इथेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी शासनाने भेदभाव केला. अंगणवाडी ताईंना निम्म्याच 25 लाखाचे तेही संघटनांच्या मागणी नंतर सुरक्षा कवच देण्याचे प्रस्तावित केले. मुळातच अंगणवाडी ताईंचे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. हे कमी म्हणून की काय वषार्पूर्वी मिळालेल्या मानधनवाढीचा फरकही अंगणवाडी ताईंना अद्याप मिळाला नाही. याविषयी प्रकल्प पातळीवर चौकशी केली असता, प्रकल्प अधिकाऱ्यांनी हजेरी पत्रके तपासून दिली आहेत, असे कोरडे उत्तर दिले गेले. तर आयुक्त कार्यालय मागच्या (फेब्रुवारी) महिन्याच्या मानधनासाठी तरतूद नाही, असे उत्तर देते. मार्चचे मानधन प्रक्रियेत असल्याचे सांगितले गेले. मानधन वाढ फरक काही प्रकल्पात मिळाला पण काही प्रकल्पांचा कोशागारात पैसे जमा होवूनही अदा होत नाही.
या सर्वात एकल स्त्रीयांचे मोठे प्रमाण असलेल्या अंगणवाडीताई बेजार झाल्या आहेत. एकीकडे लॉकडाऊनची बंधने दुसरीकडे दैनंदिन खचार्साठीही पैसे नाहीत. अशा कात्रीत त्या अडकल्या आहेत. यातून शासन प्रशासनाने त्वरित मार्ग काढावा. थकीत व नियमित मानधन, वाढ फरक अंगणवाडी ताईंना त्वरित द्यावा. कोरोनाच्या लढाईतील या सैनिकांना चिंता मुक्त करावे, असे आवाहन अंगणवाडी कर्मचारी सभेचे प्रदेश उपाध्यक्ष नितिन पवार यांनी केली आहे.