- 36 कोटी भारतीय होऊ शकतात कोरोना बाधीत
- 15 लाखांहून अधिक मृत्यूची भीती
खास प्रतिनिधी
पुणे : चिनी विषाणूला फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जाहीर केला. मात्र, हा कालावधी देखील अपुरा असून 30 जुनपर्यंत हा कालावधी वाढवला पाहिजे, अशी सूचना देशातल्या लष्करी महाविद्यालयांनी केली आहे.
देशातील वैद्यकीय संसाधनांची उपलब्धता आणि व्हेटींलेटरची संख्या लक्षात घेता पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबईतल्या आएएनएस अश्विनी या नौदलाच्या रूग्णालयातील तज्ञ्ज डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून हे मत पुढे आले आहे.
गेल्या आठवड्याभरात कोरोना बाधितांची संख्या खुप वेगाने वाढू लागली आहे. यामुळे ही स्थिती गंभीर होण्याची शक्यता गृहीत धरावी लागणार आहे. देश-विदेशातील अनेक संस्था कोरोनावरच्या उपाय योजनांच्या संशोधनात मग्न आहेत. पण आणखी किमान 8-9 महिने ही लस तयार होऊ शकत नाही, असे तज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने या संकटाला कसे तोंड द्यावे आणि तातडीच्या काय उपाय योजना कराव्यात, यावर पुण्यातील लष्करी महाविद्यालय (एएफएमसी) आणि मुंबईतील आयएनएस अश्विनी या नौदलाच्या रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे ‘मॅथेमॅटिक्स मॉडेलिंग आॅफ पोस्ट लॉकडाऊन’ या संयुक्त अभ्यासाचे आयोजन केले होते. यातून डॉक्टरांनी काढलेले विविध निष्कर्ष पुढे आले आहेत.
‘आयएनएस अश्विनी’तर्फे डॉ. कौस्तुभ चॅटर्जी, ‘एएफएमसी’तर्फे डॉ. कौशिक चॅटर्जी, डॉ. अरुण यादव आणि डॉ. शंकर सुब्रम्हण्यम यांनी हा अभ्यास केला.
त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार देशातील सध्याची परिस्थीती पाहता आताचा लॉकडाऊन 30 जुनपर्यंत वाढविण्याची गरज आहे. जूनपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली नाही व त्यावर योग्य लस उपलब्ध न झाल्यास हा कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढविणे अनिवार्य असल्याचेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे. यासाठी आंशिक लॉकडाऊनचाही पर्याय देण्यात आला आहे. अभ्यासानुसार, देशात वैद्यकीय संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.
याबाबत उदाहरण देताना अहवालात म्हटले आहे की राज्यात प्रति १ हजार व्यक्तिमागे केवळ १८४ रुग्ण भरती क्षमता आहे. तर ७० आयसीयू उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त व्हेंटिलेटर, औषधे आणि इतर वैद्यकीय संसाधनांची संख्याही अतीशय कमी आहे. त्यामुळे कमीत कमी नागरिक या आजाराने बाधित होतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत या औषधाची कोणतीही लस उपलब्ध नसल्याने, संपर्क टाळणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन कालावधी ३० जूनपर्यंत वाढविणे गरजेचे आहे.
प्रगत देशांच्या तुलनेत वैद्यकीय संसाधने मर्यादित असल्याने कोरोनाचा फटका भारताला जास्त बसू शकतो असे अनेक तज्ज्ञांना वाटते. भारतात जवळपास 36 कोटी 40 लाख नागरिक कोरोना बाधीत होऊ शकतात. रूग्णांचा हा आकडा बघता 31 लाख 20 हजार व्हेटीलेटरची आवश्यकता आहे. भारतात 15 लाखांपर्यंत मृत्यू होऊ शकतात. यातील 80 टक्के मृत्यू हे वृद्धांचे होतील, असे या अभ्यासात म्हटले आहे. भारतात केवळ 1 लाख व्हेंटीलेटर आहेत. यामुळे येत्या काळात ही संख्या वाढवावी लागणार आहे.
सध्या कोरोना बाधीतांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. ही वाढ अशीच कायम राहिली तर लॉकडाऊन कालावधी वाढवावाच लागेल. मात्र, दीर्घकाळ लॉकडॉऊन परवडणारा नसल्याने टप्याटप्याने आंशिक लॉकडाऊन करावे. यंदाच्या डिसेंबरपर्यंत हे लॉकडाऊन चालू ठेवावे लागतील, असे अभ्यासात सांगण्यात आले आहे.