विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंग यांसारख्या प्रभावी उपाययोजना केल्याने कोविड १९ फैलावास कारणीभूत ठरणाऱ्या “सार्स कोव्ही २” विषाणूची वीण कमी होण्यास महत्त्वाची मदत झाली, असा निष्कर्ष चेन्नईतील इन्स्टिट्यूट ऑफ मँथमँटिकल सायन्स या संस्थेच्या संख्याशास्रीय विश्लेषणातून काढण्यात आला आहे.
R0 म्हणजे संसर्ग झालेल्या एका व्यक्तीपासून किती लोकांपर्यंत संसर्ग पसरू शकतो ती संख्या. ही संख्या एका पेक्षा कमी असेल तर प्रादूर्भाव संपतो, असे मानण्यात येते. ५ मार्च ते ५ एप्रिल या काळात R0 चे प्रमाण १.८३ होते. तेच प्रमाण ६ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान १.५३ पर्यंत घसरले होते. असे आढळून आले आहे.
जगभरात R0 चे प्रमाण २ ते ४ असे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील केसेसचे विश्लेषण केले तर R0 प्रमाण बरेच कमी झाल्याचे आढळून आले आहे. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात आढळलेले प्रमाण याचे द्योतक आहे की बरेच रुग्ण लॉकडाऊन पूर्वीच संसर्गित झाले होते. लॉकडाऊन पाळल्यानंतरच्या काळात हेच संसर्गाचे प्रमाण बरेच घटले आहे, असे प्रोजेक्ट हेड सीताभ्रा सिन्हा यांनी सांगितले.
राज्यांमधील स्थिती अधिक गुंतागुंतीची असल्याचे त्यांनी नमूद केले. तेलंगणात लॉकडाऊन प्रभावी राबविल्याने कोविड १९ केसेसचे प्रमाण कमी झाले. महाराष्ट्रातील काही पॉकेट्स संवेदनशील राहिली तर तमिळनाडू आणि केरळमध्ये R0 चा आलेख समांतर राहिल्याचे आढळले. देशाच्या पातळीवरील सरासरी यातून घटल्याचे स्पष्ट झाले, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनच्या प्रभावाचा अभ्यास हॉपकिन्स इन्स्टिट्यूट, प्रिन्स्टन विद्यापीठ यांनीही केला आहे. या तीनही संस्थाच्या निष्कर्षांमध्ये बरीच साम्यस्थळे आढळली आहेत. अर्थात लॉकडाऊन उठल्यावर कोविड १९ फैलावावर या अभ्यासातून कोणताही प्रकाश टाकण्यात आलेला नाही.