कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करणे गरजेचे होते. मात्र, त्याच्या अंमलबजावणीची पध्दत चुकीची आहे. देशातील गरीबांना याचे सर्वाधिक परिणाम भोगावे लागत आहे, अशी टीका कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करणे गरजेचे होते. मात्र, त्याच्या अंमलबजावणीची पध्दत चुकीची आहे. देशातील गरीबांना याचे सर्वाधिक परिणाम भोगावे लागत आहे, अशी टीका कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.
गांधी यांनी कॉँग्रेस वर्कींग कमीटीच्या सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत चर्चा केली.
सोनिया गांधी म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे यामुळे देशातील लाखो स्थलांतरीत मजुरांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मोठ्या समस्या निर्माण झाल्या असून या समस्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला आता व्यापक रणनीती आखण्याची आवश्यकता आहे.
गांधी म्हणाल्या, देशापुढे आज करोना विषाणूचे मोठे संकट उभे आहे, मात्र त्याला हरवण्यासाठी आमची इच्छाशक्ती मोठी असायला हवी. कोरोनाचा पराभव करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि विश्वसनीय तपासणीला पर्याय नाही. मात्र, या वेळी आपण सर्वांनी बंधुभाव बाळगायला हवा. हे एक अभूतपूर्व मानवी संकट आहे. भयावह परिस्थिती आहे मात्र, या समस्येचा सामना करण्यासाठी संकल्प दृढ असायला हवा.
कोरोनाशी लढाई करणारे डॉक्टर्स, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचार्यांची सरकारने काळजी घेतली पाहिजे. सरकारने पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे. त्यांना सूट, एन ९५ मास्क अशा गरजेच्या वस्तू लवकरात लवकर पुरवल्या गेल्या पाहिजेत, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले.