विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : कोरोना लॉकडाऊनच्या काळात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये १०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये २३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
यातील ७३ शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात, तर ३६ शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाच्या १०% देखील विक्री लॉकडाऊनच्या होऊ शकली नाही. शेतकऱ्याच्या हाती तयार मालाचा पैसा आला नाही.
नवीन खरीप हंगामात लागवडीसाठी बियाणे, अवजारे खरेदीसाठी पैसा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाला, असे शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी सांगितले.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी २०११ ते २०१४ या कालावधीत ६२६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर २०१५ ते २०१८ या काळात दुप्पट म्हणजे ११९९५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कोरोना संकटात तर शेतकऱ्यांची स्थिती आणखी बिकट झाली आहे.