विशेष प्रतिनिधी
मुंबई : कांदिवली पूर्व येथील अवघ्या 32 वर्षाच्या चीनी व्हायरसने मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मृत्यूची नोंद अद्यापावेतो महानगरपालिकेकडे न करण्याचा अक्षम्य हलगर्जीपणा महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केला आहे.
20 एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता या तरुणाचा चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावाने मृत्यू झालेला असताना सुद्धा प्रोटोकॉलप्रमाणे कुठलीही पावले उचलली नाही. त्याच्या मृत्यूची माहिती तो राहत असलेल्या आर साऊथ वॉर्डातल्या अधिकाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर मधून कळवली गेली नव्हती. त्यामुळे हा तरुण ज्या वस्तीत राहत होता त्याच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आलेले सर्व लोक,
त्याच्या घरातले लोक आजही त्या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे या भागात सुद्धा कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनी व्हायरसने होणारे मृत्यूचे आकडे लपवण्याकरताच हा प्रकार आणि अक्षम्य हलगर्जीपणा जाणीवपूर्वक केला गेला आहे असा आरोप ही भातखळकर यांनी आपल्या या पत्रात केलेला आहे.
आता तरी तातडीने मृत व्यक्ती ज्या घरात ज्यांच्याबरोबर राहत होता त्यांचं टेस्टिंग करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे त्यासंदर्भात आपण तातडीने कार्यवाही करावी तसेच यासंदर्भात हलगर्जीपणा करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.