• Download App
    रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख | The Focus India

    रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर केली आहे तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

    आज सकाळी या दुर्दैवी घटनेसंदर्भात कळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली व घटनेविषयी जाणून घेतले.

    परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

    गेल्या ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यत अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या घरी पोहचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परटतील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका असे आवाहन परत एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे

    परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे, त्याठिकाणी अगदी शेवटचा मजूर घरी जाऊस्तोवर आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करतो आहोत, त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका. रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे व सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??