विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सर्व पक्षीय बैठक घेऊन देशभरातील विविध नेत्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. तशीच व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, असा सल्ला केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी बुधवारी चर्चा केली होती. त्यातून विविध राज्यातील प्रश्न समोर आले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात चर्चा व्हावी अशी अपेक्षा आठवले यांनी ट्विटद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात चिनी व्हायरसचा उद्रेक मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला विश्वासात घेतलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मात्र पुढे चर्चा झाली नाही.
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, जीवनावश्यक वस्तुंची मोठ्या माणात साठेबाजी होतेय. त्यामुळे किमती वाढल्या आहेत. सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे. रेशनच्या बाबती महाराष्ट्रात गोंधळ झालाय. केंद्र सरकारने कुठलीही अट न घातला राज्यांकडे अन्नधान्य पाठवलंय. पण राज्य सरकारने अटी घातल्यामुळे लोकांना धान्य मिळू शकत नाहीये.
काही मंत्री केंद्र सरकारकडे बोटं दाखवतात. एकत्र टीम म्हणून काम करायचं सोडून नकारात्कमता पसरवताय, अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.