मराठवाड्यातील मोठ्या संख्येने ऊसतोडणी मजूर पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर पट्यात अडकले. त्यांना परत गावी पाठविण्यासाठी चर्चेचे गुर्हाळ घालणार्या महाराष्ट्राला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक धडा दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठवाड्यातील मोठ्या संख्येने ऊसतोडणी मजूर पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीच्या पट्यात अडकले आहेत. त्यांना परत गावी पाठविण्यासाठी चर्चेचे गुर्हाळ घालणार्या महाराष्ट्राला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक धडा दिला आहे.
कोटामध्ये (राजस्थान) अडकलेल्या साडेसात हजार विद्यार्थ्यांना आपल्या घरी पाठविण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार २५० बस पाठविणार आहे. महाराष्ट्रातील हजारो ऊस तोडणी कामगार विविध कारखान्यांच्या क्षेत्रात हालअपेष्टा भोगत आहेत. कारखानदारांच्या दयेवर जगत आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आपल्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती करत आहेत. तरीही या चर्चेचे नुसतेच गुर्हाळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने घालून दिलेला धडा महाराष्ट्र सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
स्पर्धा परीक्षांचे अभ्यास केंद्र म्हणून ओळखले जाणार्या राजस्थानातील कोटा येथे सुमारे साडेसात हजार विद्यार्थी अडकले आहेत. कोटा शहरात उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडसह देशभरातील इतर राज्यांमधून हजारो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग विषयांच्या कोचिंगसाठी येत असतात. तिथे उत्तर प्रदेशचे साडे सात हजार विद्यार्थी 25 मार्चपासून अडकले आहेत. या विद्यार्थ्यांनी घरी परतण्यासाठी सोशल मीडियावर एक अभियानही सुरू केले होते. या अभियानाची दखल घेत योगी सरकारने दि. 18 व 19 एप्रिल अशा दोन दिवसांत हे विद्यार्थी घरी परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांना आपल्या घरी आणण्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी सरकारने अडीचशे बसेस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.