विशेष प्रतिनिधी
अयोध्या : लॉकडाऊन ३ च्या कालावधीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांधकामावरचे निर्बंध हटविताच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाची प्राथमिक कामे सुरू करण्यात आली आहेत. राम मंदिर ट्रस्टशी समन्वय साधत उत्तर प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने लोखंडी अडथळे हटवून जमीन सपाटीकरणाचे काम केले आहे. तेथील मातीची मजबूती तपासण्यासाठी मातीचे नमूने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल आला की प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात करण्यात येईल.
राम मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाचे बांधकामही पूर्ण करून तेथूनच ट्रस्टच्या कामास लवकरच सुरवात करण्यात येईल, असे चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले. श्रीराम तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली सरकारी सार्वजनिक बांधकाम खाते आणि लार्सन अँड टर्बो कंपनी मंदिराचे बांधकाम ना नफा ना तोटा या तत्त्वावर करीत आहे.
राम मंदिर ट्रस्टच्या नियमित बैठका विडिओ कॉन्फरन्सद्वारे होत असून त्यात आता मंदिराच्या बांधकामासंबंधी दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. २०२२ पर्यंत राम जन्मभूमी मंदिराचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे.