- संरक्षण उत्पादनात भारतीय कंपन्यांच्या सहभागाचा प्रस्ताव १९८८ सालचा…!!
विनय झोडगे
पुणे : संरक्षण उत्पादन क्षेत्रात मेक इन इंडिया संकल्पाला सुरवात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक प्रकारे प्रख्यात उद्योगपती कै. शंतनूराव किर्लोस्करांचे स्वप्नच पूर्ण करत आहेत.
भारताला लागणाऱ्या संरक्षण सामग्रीचे उत्पादन भारतातच करावे. यासाठी सरकारने भारतीय कंपन्यांना मूभा द्यावी, असा प्रस्ताव शंतनूराव किर्लोस्करांनी १९८८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना दिला होता. त्यावेळी शंतनूराव हे “फिक्की” या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने एक स्वतंत्र पेपर तयार करून संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांना कसा वाव देता येईल, भारताचे संरक्षण सामग्रीची गरज भारतीय कंपन्या कशा भागवू शकतात, याचा तपशीलवार आराखडा या पेपरमधून सादर करण्यात आला होता.
सरकारने भारतीय कंपन्यांवर विश्वास ठेवावा. या कंपन्यांमधील तरूण प्रतिभेला संशोधनात वाव द्यावा. सरकारने संरक्षण सामग्री उत्पादनाची संपूर्ण नियमावली तयार करावी. त्या नियमावलीला अनुसरून भारतीय कंपन्या आर्थिक गुंतवणूक करून संरक्षण सामग्रीचे उत्पादन करतील. या उत्पादनांच्या संख्येवर आणि गुणवत्तेवर संरक्षण खात्याचे नियंत्रण ठेवावे. त्यांनी उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा सूचवाव्यात. नंतर सरकारने कंपन्या कडून ही संरक्षण सामग्री खरेदी करावी. यातून भारतीय कंपन्यांना महसूल मिळेल. संशोधनात तरूण प्रतिभेला वाव मिळेल. मोठ्या प्रमाणावर देशातच रोजगाराचे एक नवे कौशल्यक्षेत्र विकसित होईल, या अशा अनेक सूचनांचा या पेपरमध्ये समावेश होता.
शंतनूरावांचे आत्मचरित्र Cactus and Roses मध्ये याचे सर्व तपशील वाचायला मिळतील.
राजीव गांधी, व्ही. पी. सिंह, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी या सर्व पंतप्रधानांना ही संधी होती, पण नरेंद्र मोदी हे संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया या संकल्पाला वेगळ्या प्रकारे सुरवात करून शंतनूराव यांचीच स्वपपूर्ती करताना दिसत आहेत. यात ७४% पर्यंत FDI ला मूभा देण्या बरोबरच ऑर्डिनन्स कारखान्यांचे निगमीकरण आणि कारखान्यांचे शेअर बाजारात लिस्टिंग या महत्त्वपूर्ण निर्णयांचाही समावेश आहे. यातूनही भारतीयांची गुंतवणूक या कारखान्यांना बळ देईल आणि कारखान्यांचे state of the art facilities द्वारे आधुनिकीकरणही होईल. ही देखील शंतनूरावांची व्यापक अर्थाने स्वप्नपूर्तीच आहे.
योगायोग असा की संरक्षण सामग्रीचे उत्पादन भारतीय कंपन्या करतील, हे स्वप्न पाहणारे शंतनूराव किर्लोस्कर हे FICCI चे अध्यक्ष होते. आज संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया च्या संकल्पाला प्रत्यक्ष सुरवात होताना शंतनूरावांचे नातू विक्रम किर्लोस्कर हे CII चे अध्यक्ष आहेत…!!