विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरस कोविड १९ चा मुकाबला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षमपणे करताहेत, अशी प्रशंसा मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे. मोदींना त्यांनी पत्र लिहिले आहे.
या पत्रात गेट्स यांनी मोदी यांच्या नेतृत्व कौशल्याची, वेगवान आणि अचूक निर्णयक्षमतेची आणि भारतीयांच्या संयमाची, चिकाटीने लढा देण्याच्या गुणांची तारीफ केली आहे. गेट्स यांनी पत्रात म्हटले आहे, की कोविड १९ चे आव्हान भारतीय नेतृत्वाने अर्थात नरेंद्र मोदींनी वेळीच ओळखले. लॉकडाऊनसारख्या उपाययोजना, वैद्यकीय चाचण्या, तपासण्या यांच्या सुविधा भारत सरकारने वेळेत उपलब्ध केल्या आणि आवश्यक तेथे वाढविल्या. या संकटकाळात जनजागृतीसाठी नवतंत्राचा सर्वोत्तम वापर मला भारतात दिसला. भारत सरकारने आरोग्यसेतू अँप तयार करून त्याचा सकारात्मक आणि सर्वात परिणामकारक वापर केला. त्यामुळे भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात कोविड १९ चा प्रादूर्भाव मर्यादित राहिला. सरकारने केलेल्या परिणामकारक उपाययोजनांमुळे त्याच्या फैलावाला रोखता आले.
कोविड १९ चा वाढता आलेख रोखणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे जागतिक पातळीवर वाखाणण्यासारखेच यश आहे, असेही गेट्स यांनी पत्रात आवर्जून नमूद केले आहे.
भारतातील सार्वजनिक आरोग्य सुधारणेसाठी सरकारने संशोधन आणि अभिनव कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा गेट्स यांनी विशेष उल्लेख केला. भारतीयांनी केलेले संशोधन भारताबरोबरच संपूर्ण जगासाठी उपयोगी ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.