• Download App
    मोदींच्या फोनमुळे भारावले मराठी वृत्तपत्रांचे मालक; व्यक्तिगत कॉल 'व्हायरल' | The Focus India

    मोदींच्या फोनमुळे भारावले मराठी वृत्तपत्रांचे मालक; व्यक्तिगत कॉल ‘व्हायरल’

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुण्यातील ‘सकाळ’ वृत्तपत्र समुहाचे मालक अभिजीत पवार यांच्यात झालेल्या दूरध्वनी संवादाची चर्चा सोशल मीडियात जोरदार रंगली आहे.

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे धाकटे बंधू प्रतापराव यांचे अभिजीत हे पुत्र आहेत. संपूर्ण देशात तब्बल 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महत्वाच्या वृत्तपत्र-प्रसार माध्यमांच्या मालकांशी वीडियो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. या नंतर काही मोजक्या मालक मंडळींना मोदी यांनी व्यक्तिगत फोन कॉलही केले होते.

    यातीलच एक कॉल अभिजीत पवार यांनाही आला. 2014 मध्ये याच अभिजीत पवारांनी भाजपतर्फे पुणे लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी मोदी अनुकूल असल्याचीही चर्चा त्यावेळी होती. देवेन्द्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. दरम्यान, मंगळवारी झालेल्या मोदी-पवार यांच्यातील कथित संवादात मोदी यांनी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या समस्येची चर्चा केल्याचे दिसते. पवारांनी यावेळी महाराष्ट्रातील समस्येबद्दल मोदी यांना अवगत करण्याचा प्रयत्न केला. तसेच काही पर्याय सुचवले. मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या संवादाचेही पवारांनी तोंड भरुन स्वागत केले.

    दरम्यान, देशभरातील वृत्तपत्र मालकांसोबत झालेल्या ‘वीडियो कॉन्फरन्स’मध्ये तुमच्याशी बोलायचे होते. पण त्यावेळी न जमल्याने आता फोन केला, असे मोदी यांनी फोनवरुन सांगताच पवार भारावून गेल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना विषाणू विरोधातील लढ्यासंदर्भात पवारांनी केलेल्या सुचनांवर मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुमारे 3 मिनिटे 23 सेकंदांचा मोदी यांच्याशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग गेल्या काही तासात महाराष्ट्रभर व्हायरल झाले आहे. यावर उलटसुलट चर्चा चालू आहेत. मोदी यांच्या वीडियो कॉन्फरन्समध्ये पवार यांच्या व्यतिरीक्त महाराष्ट्रातल्या अन्य प्रसारमाध्यमांचे मालकही उपस्थित होते. पवारांप्रमाणेच यातील काहींना मोदींनी व्यक्तिगत फोन कॉल केले. मात्र इतरांनी त्याची वाच्यता केली नाही. पवारांनी हे भान का दाखवले नाही, मोदींनी दाखवलेल्या विश्वासाचा हा गैरफायदा आहे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रीया सोशल मीडियात उमटल्यात.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…