राज्यात चीनी व्हायरसग्रस्तांची संख्या वाढत आहे. यावेळी राज्याची सर्व आरोग्य व्यवस्था या रुग्णांच्या उपचारासाठी गेल्याने इतर रुग्ण मात्र उपचाराविना तडफडत आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. इतर रुग्णांकडे आणि प्रामुख्याने थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात चीनी व्हायरसग्रस्तांची संख्या वाढत आहे. यावेळी राज्याची सर्व आरोग्य व्यवस्था या रुग्णांच्या उपचारासाठी गेल्याने इतर रुग्ण मात्र उपचाराविना तडफडत आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. इतर रुग्णांकडे आणि प्रामुख्याने थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची मागणीत्यांनी पत्रातून केली आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्यभर शुक्रवारी आघाडी सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन केले होते. चीनी व्हायरसचा सामना करण्यास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले होते. मात्र, आता फडणवीस यांनी राज्यातील इतर रुग्णांची व्यथा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सांगितली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात, आपण सारे चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विविधप्रकारे सामना करत आहोत. एकीकडे या उपचार मिळण्यात येत असलेल्या अडचणी आणि दुसरीकडे या आजाराव्यतिरक्ति विविध रुग्णांना-आजारी व्यक्तींना उपचार, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. विविध आजारांचे प्रश्न पुढ्यात येत आहेत.
अशावेळी शासन म्हणून करोनाग्रस्त आणि इतरही रुग्णांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे नितात गरजेचे आहे. राज्यात अनेक स्वयंसेवी संस्थांमार्फत थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना विशेषत: लहान मुलांनी नियमित स्वरुपात लागणारे रक्त उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी काही संस्थांनी नियमित रक्तदात्यांची साखळी तयार केलेली असते. काही संस्था सामाजित दायित्व म्हणून देणगी देणाऱ्यांवर अवलंबून असतात. तथापि सध्या करोनाच्या संकटात टाळेबंदी असल्याने त्यांनी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. या संस्था अडचणीत आल्याने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा करणे हे अतिशय जिकरीचे काम होऊ बसले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
थॅलसेमियाग्रस्त रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा न झाल्यास आरोग्याच्या गंभीर समस्यांचा मुकाबला करावा लागू शकतो. या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने मदत दिल्यास मोठा आधार मिळू शकतो. आपण या विनंतीचा सकारात्मकपणे विचार कराल आणि निर्देश द्याल हा मला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.