Monday, 5 May 2025
  • Download App
    मुंबई 'चालवणार्‍या' ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, हॉकर्स, बेस्ट चालक-वाहक तसेच सिनेसृष्टीतल्या कामगारांना भाजपाची मदत; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण | The Focus India

    मुंबई ‘चालवणार्‍या’ ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, हॉकर्स, बेस्ट चालक-वाहक तसेच सिनेसृष्टीतल्या कामगारांना भाजपाची मदत; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, हॉकर्स, बेस्ट बस गाड्यांचे चालक आणि वाहक तसेच सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांसाठी मदत सामुग्रीचे किट्स माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या-त्या क्षेत्रातील संघटनांकडे सुपूर्द करण्यात आले.

    मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक आणि फेरीवाले, विक्रेते यांच्यासाठी अन्नधान्याच्या  30 हजार किट्स देवेंद्र फडणवीस यांनी कामगार नेते शशांक राव यांना प्रदान केल्या. एका परिवाराला लागणारा तांदूळ, गहू, पीठ, डाळ, चहा, साखर, खाद्यतेल आणि मीठ अशी सामुग्री एका किटमध्ये आहे.

    बेस्टमध्ये काम करणारे चालक आणि वाहक (कंडक्टर) यांच्यासाठी सुरक्षेसाठी मास्क आणि इतर किट्स सुद्धा कामगार नेते शशांक राव यांना सुपूर्द करण्यात आल्या. या सुमारे 20 हजार मास्क किट्स आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत यावेळी आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

    मुंबईतल्या सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांसाठी अन्नधान्य, कडधान्ये, तेल, चहा अशा 3 हजार किट्स भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष विजय सरोज आणि सरचिटणीस सत्यवान गावडे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केल्या. सध्या संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने गरिबांची गैरसोय होऊ नये, म्हणून भाजपाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

    महात्मा फुले यांना अनोखी आदरांजली

    कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना आज तंत्रज्ञानाची मदत घेत महाराष्ट्र भाजपाने महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीदिनी अनोखी आदरांजली अर्पण केली. सुमारे अडीच लाखांवर नागरिक, कार्यकर्ते या अनोख्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

    असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते, फक्त ज्ञानाचा प्रकाश असावा लागतो. असाच ज्ञानप्रकाश ज्यांनी सर्वांमध्ये जागविला, त्या महात्मा जोतिबा फुले यांना आज अभिवादन करण्यासाठी राज्यातील प्रमुख भाजपानेते झूम अ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र जोडले गेले होते आणि ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि नागरिकांशी जोडले गेले. एखाद्या सामान्य कार्यक्रमाप्रमाणेच हा कार्यक्रम झाला.

    माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्‍याच नेत्यांनी आहे त्याठिकाणी महात्मा फुले यांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण केली. विजयराव पुराणिक यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रमुख भाषण यावेळी झाले.

    व्ही. सतीशजी, चंद्रकांतदादा पाटील, एकनाथराव खडसे, पंकजाताई मुंडे, विनोद तावडे, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, अतुल भातखळकर, रवींद्र चव्हाण, डॉ. संजय कुटे, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, संजय उपाध्याय हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता पुढचा कार्यक्रम 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा होणार आहे. त्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते हे देवेंद्र फडणवीस असतील. भाजपा महिला आघाडीने 25 लाख मास्क तयार करण्याचा निर्णय घेतला असून, मास्कवाटपाचे महत्त्वाचे उद्दिष्ट हे त्यादिवशी साध्य करण्यात येईल.

    Related posts

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!