विशेष प्रतिनिधी
मालेगाव : शहरात कोरोनाचा फैलाव थांबायचे नावच घेत नाहीये. शहराची एकही दिशा कोरोनाच्या फैलावापासून सुटलेली नाही. शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून शहरातील पश्चिम भागात या विषाणूचा प्रभाव वाढला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील या विषाणूचा शिरकाव झाला आहे.
दि. ३ मे रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार ३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यातील १० रुग्ण फेर तपासणीत पॉझिटिव्ह आले आहेत तर २७ रुग्ण नवीन आहेत. शहरातील रुग्णांची संख्या ३२४ इतकी झाली आहे. या रुग्णांमध्ये शहरातील संगमेश्वर भागातील जगताप गल्ली, पाट किनारा तसेच कॅम्प व सटाणा नाका भागातील रुग्ण आढळल्याने पश्चिम भागात धास्ती वाढली आहे.
मालेगाव शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दि.३ मे रोजी सकाळी १२८ अहवाल प्राप्त झाले यातील ९१ रुग्ण निगेटिव्ह असून ३७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १० अहवाल हे फेर तपासणी मधील असून २७ रुग्णांचे अहवाल नवीन आहेत. या २७ रुग्णामध्ये २३ पुरुष ३ महिला व एका ९ महिन्याच्या बालिकेचा समावेश आहे. शहरातील एकूण रुग्ण संख्या ३२४ झाली असून यातील १३ रुग्ण मृत तर २० रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी परतले आहेत.