विशेष प्रतिनिधी
धुळे : मालेगावची कोरोना फैलावाची परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली आहे, की तेथे लष्कराला पाचारण करण्याखेरीज पर्याय नाही.
धुळे – मालेगाव मतदारसंघाचे खासदार डॉ. सुरेश भामरे यांनी ही मागणी केली आहे. केंद्रात संरक्षण राज्यमंत्री राहिलेल्या खासदारांनी अशी मागणी करणे याला राजकारणा पलिकडेही महत्त्व आहे. नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ व दादा भुसे यांच्या रूपाने दोन मंत्री लाभले आहेत. तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नाही. त्यातही दादा भुसे मालेगावचे आहेत. मात्र तेथील परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे.
करोना विषाणुची मालेगावात परिस्थिती अंत्यत बिकट होत चालली आहे. मालेगावातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मालेगावात मिलिटरीला पाचारण करण्याची मागणी धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. सुभाष भामरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
खा. डॉ. सुभाष भामरे ट्विटमध्ये म्हणाले आहे की, मालेगाव येथील परिस्थिती बघता जी मागणी मी महिन्यापूर्वीच केली होती आणि सातत्याने करतोय कि मालेगाव मध्ये मिलिटरी ला पाचारण करा. तीच मागणी आता मालेगाव च्या रहिवास्यांकडून करण्यात येत आहे. आता तरी राज्य सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा. असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, खा. डॉ. सुभाष भामरे यांच्यासह धुळे भाजपातील शिष्टमंडळाने मालेगावातील करोनाबाधित रूग्णांवर धुळ्यात उपचार करू नये यासाठी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन दिले होते.