मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्य सरकारने अत्युच्च माणुसकीच्या भावनेचा आदर्श देत नर्मदा परिक्रमा करून अडकलेल्या भाविकांना घरी सोडले. मात्र, मराठी भाविकांसाठी महाराष्ट्राच्या उध्दव ठाकरे सरकारला मात्र पाझर फुटला नाही.
विशेष प्रतिनिधी
पुणे : मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान यांच्य सरकारने अत्युच्च माणुसकीच्या भावनेचा आदर्श देत नर्मदा परिक्रमा करून अडकलेल्या भाविकांना घरी सोडले. या मराठी भाविकांसाठी महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे सरकारला मात्र पाझर फुटला नाही.
नर्मदा परिक्रमा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील शंभर भाविकांना टप्प्याटप्याने सोडण्याचा निर्णय नर्मदा समग्र न्यास संस्था, भोपाळ आणि मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबई यांसह गुजरात मधील काही भाविकांना संपूर्ण वैद्यकीय तपासणी केल्यानंतर विशेष गाड्या करून सोडण्यात आले आहे.
सहा महिन्यांपूर्वी नर्मदा परिक्रमेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांची परिक्रमा पूर्ण झाली असून, आता या भाविकांना घराची ओढ लागली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक टाळेबंदीमुळे जवळपास 100 भाविक गोमुख घाट, ओंकारेशवर ( मध्यप्रदेश) येथे अडकले होते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी आम्हाला घरी सोडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी भाविकांनी केली होती. पण किती दिवस भाविकांना इथे ठेवणार या भूमिकेतून नर्मदा समग्र न्यास संस्था, भोपाळ आणि मध्य प्रदेश सरकारने या भाविकांना ‘ इ- पास’ देऊन सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र एकत्रितपणे सर्व भाविकांना न सोडता टप्याटप्याने त्यांना विशेष गाडी करून स्वगृही सोडण्यात येत आहे. त्यानुसार काही भाविक आज पुण्यात पोहोचले.
यासाठी मध्य प्रदेश सरकारने विशेष गाडीची व्यवस्था करण्यात केली. ती गाडी पूर्णपणे सॅनिटाईज केली. कुठेही न उतरणे आणि कशाला देखील हात न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. भाविकांना इ- पास देण्यात आले होते. आमची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मध्यप्रदेश बॉर्डर ओलांडल्यानंतर महाराष्ट्रात प्रवेश करताना आम्हाला ठिकठिकाणी विचारणा झाली. मात्र आमच्याजवळचा इ पास बघितल्यानंनर सोडण्यात आले, असे पुण्यातील भाविक जान्हवी भंडारी यांनी सांगितले.
नर्मदा परिक्रमासाठी ओंकारेशवर येथे जवळपास 100 पेक्षाही अधिक भाविक आहेत. त्यांना स्वगृही पाठविण्यासाठी नर्मदा समग्र न्यास भोपाळ आणि मध्य प्रदेश सरकारने सहकायार्तून हा निर्णय घेतला. भाविकांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने उलट त्रास अधिक दिला. आपल्या लोकांसाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र सरकारने तेवढे तरी करायला पाहिजे होते, असे भोपाळच्या नर्मदा समग्र न्यासाचे झोनल कोआर्डिनेटर मनोज जोशी यांनी सांगितले.
केवळ नर्मदा परिक्रमेचे भाविकच नव्हे तर देशात इतर ठिकाणी अडकलेल्या मराठी बांधवांबाबतही महाराष्ट्र सरकारची भूमिका असंवेदनशिलच आहे. हिमालयात ट्रेकिंगला गेलेले १० महाराष्ट्राचे ट्रेकर्स गेल्या महिन्याभरापासून दार्जिलिंगमध्ये अडकलेले आहे. हे सर्व ट्रेकर्स सुरक्षित आहेत. पण या सर्वांना आपल्या घरी यायचे आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. मात्र, त्यांचीही दखल घेतलेली नाही.