- पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यांचे समर्थन
- सरकारपासून सुरक्षित अंतर राखण्याची काँग्रेसची सुरूवात
- ठाकरे यांच्या अपयशाची जबाबदारी काँग्रेसवर नको, असा व्यवहारी विचार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात आम्ही ‘डिसीजन मेकर’ नाही, असे सांगत राहुल गांधींनी पृथ्वीराज चव्हाणांच्या आजपर्यंतच्या वक्तव्यांना एक प्रकारे समर्थन दिले. एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थिर आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सरकारच्या पाठिशी ठाम उभे आहेत, या शरद पवारांच्या दाव्यातील हवाही त्यांनी काढून घेतली.
महाराष्ट्रात सरकार शिवसेनेचे आहे. काँग्रेसचे नाही, अशा वक्तव्याची काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात, ‘मी मंत्रिमंडळात नाही. सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे आहे,’ असे चव्हाण यांनी म्हटले होते. या वक्तव्यालाच राहुल गांधी समर्थन दिले. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचेही सरकार बरोबर राहण्याचे वक्तव्य उघडे पडले.
कोरोना व्हायरस आणि देशात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे. “आमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. आम्ही तेथील ‘डिसीजन मेकर’ नाही,” असे राहुल गांधी यांनी सांगून काँग्रेस नेत्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.
यावेळी एका पत्रकाराने महाराष्ट्रातील सध्यस्थितीचा उल्लेख करत राहुल गांधी यांना प्रश्न केला होता, की देशातील एक तृतियांश कोरोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. तेथील सरकारमध्ये तुम्ही सहभागी आहात. मुंबईत महाराष्ट्राच्या अर्ध्याहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रानेही राज्यात लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते का? कारण तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, देशातील दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या मोस्ट कनेक्टेड शहरांमध्येच कोरोना वाढत आहे, असे आपल्याला दिसून येईल. मी आपल्याला एक फरक सांगू इच्छितो, की आमचा महाराष्ट्र सरकारला केवळ पाठिंबा आहे. मात्र, आम्ही तेथील ‘डिसिजन मेकर’ नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान आणि पदुच्चेरी येथे डिसिजन मेकर आहोत. हा सरकार चालवण्यामधला आणि सरकारला पाठिंबा असण्यामधील फरक आहे. महाराष्ट्र संघर्ष करत आहे.
मुंबई देशातील एक आर्थिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईला सहकार्य करायला हवे. मला जाणीव आहे, की महाराष्ट्र कठीण लढाई लढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करणे आवश्यक आहे.”
मुंबई में 3 लाख प्रवासी गांव जाने के लिए बेचैन हैं।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) May 26, 2020
पुलिस स्टेशनों में उनकी लिस्ट पड़ी है।
पुलिसवाले खुद ट्रेन मांग रहे हैं।
रेल मंत्री कह रहे हैं वे ट्रेन दे रहे हैं पर सरकार यात्री नहीं मुहैया करा रही है।
आखिर मुख्यमंत्री कार्यालय और बाबू लोग गरीबों पर क्यों जुल्म ढा रहे हैं ? https://t.co/OVzG6IaFps
काँग्रेसचे सरकारे असलेल्या राज्यांसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार गरिबांना पैसे आणि भोजन देत आहे. आम्हाला माहिती आहे, की पुढे काय करायला हवे. पण राज्ये किती काळ एकटेच लढाई लढतील. केंद्रालाही पुढे यावे लागेल आणि नियोजनासंदर्भात देशाशी बोलावे लागेल.
राहुल गांधी याचे हे उत्तर पाहता राज्याच्या सत्तेत काँग्रेसला आता रस उरला नसल्याचे जाणवते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास राहुल गांधी यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. मात्र, त्यांनी नाखुशीनेच अखेर पाठिंबा दिला होता. आता महाविकास आघाडी सरकारला सहा महिने पूर्ण होत असतानाच काँग्रेसने आपले खरे रंग दाखवायला सुरूवात केली आहे. कारण राहुल गांधी यांच्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्य नाही त्याचप्रमाणे नुकतेच हे सरकार आमचे नाही, हे शिवसेनेचे सरकार आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते.
त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांनतर खुद्द राहुल गांधी यांनीच सरकारविषयी असे बोलणे हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अपयशाची जबाबदारी काँग्रेस पक्षावर नको, असा व्यवहारी विचार राहुल गांधी करीत असल्यास त्यात नवल नाही. केवळ पाठिंबा देण्यास काँग्रेसला रस नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे आगामी काळात काँग्रेस पाठिंबाही काढून घेऊ शकते. त्यामुळे सरकारपासून सुरक्षित अंतर राखण्याची सुरूवात काँग्रेसने आता केली आहे.