पोलिसांवर कारवाईची मागणी
विशेष प्रतिनिधी
पालघर : ‘काठ्यांना तेल पाजून ठेवा,’ असे गृहमंत्री अनिल देशमुख सांगत होते. त्याचा किती विपरीत परिणाम महाराष्ट्राच्या पोलीस दलावर झाला, याचे असंवेदनशील उदाहरण पालघर जिल्ह्यात पाहण्यास मिळाले.
लॉकडाऊनमुळे रोजगाराचे सर्व मार्ग बंद असल्याने अनेक कुटुंबांची उपासमारीची दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. किनारपट्टीवरील अनेक कोळी कुटुंबे खाडीतल्या मासेमारीवर आपला उदारनिर्वाह चालवीत असतात. खाडीतले शिंपल्या, कालवे काढण्यासाठी गेलेल्या सातपाटी व मुरबा या गावच्या मच्छीमार, आदिवासी महिलांना सातपाटी सागरी पोलिसांनी चक्क उठाबशा काढायला लावल्या. एवढ्यावर न थांबता याचे चित्रीकरण करुन तो व्हिडिओ व्हायरल केला.
पोलिसांच्या या कृत्याचा निषेध होत असून संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी महिला वर्गातून पुढे आली आहे.
सातपाटी व मुरबे या किनारपट्टीवरील गावातील मासेमारी चिनी व्हायरसच्या उद्रेकामुळे बंद आहे. त्यामुळे मच्छीमारीवर अवलंबून असणार्या हजारो कुटुंबांच्या हाताला काम नाही. सातपाटीमधील हातावर पोट असणाऱ्या 700 ते 800 लोकांना ‘सातपाटी इलेव्हन’ या स्थानिक तरुण मंडळाकडून व काही ग्रामस्थ लोकांच्या सहकार्याने 2 महिन्यापासून दोन वेळचे जेवण दिले जात आहे. परंतु या मदतीलाही आता मर्यादा पडत आहेत.
सातपाटी व मुरबे या दोन्ही गावातल्या सुमारे 200 ते 300 मच्छीमार व आदिवासी महिला खाडीतल्या मासेमारीवर उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण करतात. परंतु लॉकडाऊन संपत नसल्याने, हाताला काम नसल्याने खाडीतले मासे पकडून दोन वेळच्या जेवणाची तजवीज व्हावी म्हणून अनेक लोक खाडीतील मासे, शिंपल्या पकडण्यासाठी जात होते. खाडीतल्या पाण्यात बसून मासे, शिंपल्या पकडीत असताना सातपाटी सागरी पोलिसांनी चक्क महिलांना धाक दाखवीत पाण्यातून बाहेर काढले.
ओल्या कपड्यातच पुरुषांसमोर उठाबशा काढायला लावल्या. यावेळी महिला पोलीस उपस्थित नव्हते. तरी महिलांना सार्वजनिक ठिकाणी शिक्षा करुन त्याचे चित्रीकरण करण्यात आले. संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. उच्च न्यायालयानेही लॉकडाऊन काळात पोलिसांनी स्वतःहून शिक्षा देणे बेकायदा असल्याचे स्पष्ट केले होते.