विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित नवीन रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पुणे, मुंबई या शहरांमध्ये बाधीतांची संख्या एकदम वाढत आहे. शिवाय, नगर, रत्नागिरी, सांगली या शहरातही कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने राज्यातील रुग्ण संख्या पाचशेच्या घरात गेली आहे. कोरोना बाधीत बळींची संख्या ६ आहे.
बळी गेलेल्यांची एकूण संख्या २६ झाली असून यातल्या ६ जण गेल्या २४ तासातले आहेत.
या ६ बळी रुग्णांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –
- वसई विरार येथे मृत्यू झालेला ६८ वर्षीय पुरुष हा दिनांक २९ मार्च २०२० रोजी येथील एका खाजगी रुग्णालयात भरती झालेला होता. त्याचा भाचा फेब्रुवारीच्या पहिल्या आठ्वडयात अमेरिकेहून आला होता पण भाच्याला कोणतीही लक्षणे नव्हती. या रुग्णास मधुमेह होता.
- बदलापूर ठाणे येथे मृत्यू झालेली महिला ही एका खाजगी रुग्णालयात भरती होती. मधुमेह, उच्च रक्तदाब, मेंदूत रक्तस्त्राव, मणक्याचे फ्रॅक्चर असलेली ही महिला बराच काळापासून बिछान्याला खिळून होती. त्यामुळे तिला बेडसोर देखील झालेले होते. तिचा कोणत्याही परदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता.
- जळगाव येथे मृत्यू झालेला ६३ वर्षीय पुरुष हा जळगाव मधील करोना बाधित रुग्णाचा सहवासित होता. त्याला मधुमेह, उच्च रक्तादाब होता आणि १ महिन्यापूर्वी त्याची ॲन्जिओप्लास्टी झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे त्याचा मृत्यू झाला.
- पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेली ५० वर्षीय महिला २८ मार्च रोजी भरती झाली होती. तिने परदेशात प्रवास केलेला नव्हता.
- मुंबईच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू पावलेला ६५ वर्षीय पुरुष हा मूत्रपिंडाच्या व्याधीचा जुना रुग्ण होता. त्याने कोठेही परदेश प्रवास केलेला नव्हता.
- मुंबईतील राजावाडी रुग्णालयात एका ६२ वर्षाच्या मधुमेही रुग्णाचा मृत्यू झाला.कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २६ असून सध्या ३८ हजार ३९८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात (क्वारंटाईन) असून ३ हजार ७२ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १ हजार २२५ व्यक्तींच्या यादीपैकी १ हजार ३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे.