अम्फान महाचक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हवाई पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर आढावा बैठक घेऊन मदत आणि बचाव कार्याबाबत चर्चा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: अम्फान महाचक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हवाई पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर आढावा बैठक घेऊन मदत आणि बचाव कार्याबाबत चर्चा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
पश्चिम बंगाल आणि ओडिशाचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे उडालेल्या हा:हा:काराचे फोटो पाहून पंतप्रधानही भावनाविवश झाले. त्यांनी याबाबत ट्विट करून संपूर्ण देश संकटाच्या या काळात पश्चिम बंगालसोबत असल्याचा विश्वास दिला. येथील जनजीवन पुन्हा सुरळित होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
ते म्हणाले, बंगालमधील विनाशाचे दृष्य पाहिले. संपूर्ण देश बंगालसोबत आहे. राज्यातील नागरिकांसाठी प्रार्थना करतो. राज्याच्या मदतीसाठी कोणतीच कसर ठेवणार नाहीत. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर चर्चा करून सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वास दिले.
पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील परिस्थितीची पाहणी करावी आणि आर्थिक पॅकेज द्यावं, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वादळाचा तडाखा बसलेल्या भागाची हवाई पाहणी करणार आहेत.
अम्फान वादळाचा तडाखा प. बंगालसह ओडिशालाही बसला आहे. वादळामुळे ओडिशातील वीजपुरवठा यंत्रणेचे आणि टेलिकॉम सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे ओडिशातील नुकसानीची पाहणीही पंतप्रधान मोदींकडून करण्यात येणार आहे, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल सरकारने वादळात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना २.५ लाखांची मदत घोषित केलीय. तसंच नुकसान झालेल्या पायभूत सुविधांच्या उभारणीसाठी १ हजार कोटींचा निधी देण्यात येईल आहे, असं ममता बॅनर्जींनी सांगितले आहे.