देशातील चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईला मोठा धक्का दिलेल्या निजामुद्दीन मरकझ प्रकरणी २९४ विदेशी तबलिगींविरोधात आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहे. मार्च महिन्यात देशात चीनी व्हायरसचा धोका वाढत असताना मरकझमध्ये नियमबाह्यपणे हजारो तबलिगी जमले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईला मोठा धक्का दिलेल्या निजामुद्दीन मरकझ प्रकरणी २९४ विदेशी तबलिगींविरोधात आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहे. मार्च महिन्यात देशात चीनी व्हायरसचा धोका वाढत असताना मरकझमध्ये नियमबाह्यपणे हजारो तबलिगी जमले होते.
तबलिगी जमातीचा प्रमुख मौलाना साद याच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकझचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून धार्मिक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल, बेकायदेशीरीत्या धर्मप्रचाराच्या उपक्रमांत भाग घेतल्याबद्दल आणि देशात चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी बुधवारी २९४ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्रे सादर केली.
मलेशिया, थायलंड, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि अनेक आफ्रिकी देशांसह १४ देशांच्या २९४ विदेशी नागरिकांविरुद्ध साकेत न्यायालयात १५ आरोपपत्रे सादर करण्यात आली. महानगर दंडाधिकारी सायमा जमील यांनी हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी १७ जूनला ठेवले आहे. यापूर्वी मंगळवारी पोलिसांनी ८२ विदेशी नागरिकांविरुद्ध २० आरोपपत्रे दाखल केली होती. तबलिगी जमातने मार्च महिन्यात दिल्लीच्या निझामुद्दीन भागात आयोजित केलेला मोठा धार्मिक मेळावा देशातील करोना विषाणूच्या अतिसंक्रमणाचे केंद्र ठरला होता.