विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकात स्थलांतरित मजूर, कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी राज्याच्या अंतर्गत प्रवास मोफत करण्याची घोषणा येडियुरप्पा सरकारने केली आहे.
आज ३ मे पासून पुढचे ३ दिवस मजूर, कामगारांना गावी जाण्याचा एका मार्गाचा प्रवास मोफत करता येईल. कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवासासाठीच ही सवलत असणार आहे.
परिवहन मंडळाच्या बसचे वाहक मजूर आणि कामगारांकडून गावी जाण्याच्या मार्गावरचे दुप्पट भाडे वसूल करतात. त्यांना गावी सोडल्यानंतर बस डेपोत रिकामी आणावी लागते, असे कारण सांगून ही दुप्पट भाडेवसूली होत होती. या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी मजूर, कामगारांना मोफत प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय घेतला. सीएमओने तशा सूचना परिवहन मंडळाला देऊन लगेच त्याची अंमलबजावणी सुरू केली.
५१८ बसमधून आतापर्यंत १५ हजार मजूर, कामगारांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे. परिवहन मंडळाच्या बसमध्ये सीटची मर्यादा ५५ आहे. यात सोश डिस्टंसिंग पाळून ३० प्रवासी भरून गाड्या सोडण्यात येतात.