विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील शालेय पोषण आहार योजनेतील माल वाहतुकीच्या निविदेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. कडू यांनी या विभागाच्या मंत्र्यांना लिहिलेले पत्रच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात विधानसभा वाचून दाखविले. स्वतःच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी केलेल्या आरोपाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार का, असा प्रश्न मंत्रालयात विचारला जात आहे.
नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात फडणवीस यांनी सभागृहात कडू यांच्या पत्राचे वाचन केल्याने खळबळ उडाली होती.. सत्तेत सहभागी असलेल्या मंत्र्यानेच कारभाराबाबत तक्रार केल्याने राज्य सरकारच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे फडणवीस या पत्राचे वाचन करीत असताना राज्यमंत्री बच्चू कडू सभागृहात उपस्थित होते. पत्र वाचताना फडणवीस यांना पत्र लिहिण्याच्या भूमिकेबाबत विचारले असता, कडू यांनी होकारार्थी मान हलवून फडणवीस यांना दुजोरा दिला होता. राज्यात सत्तेत असलेल्या मंत्र्यांना आपल्याच सरकारमधील गैरकारभार सांगण्यासाठी पत्र पाठवून दाद मागावी लागते हे या सरकारचे अपयश असल्याची फडणवीस यांनी यावेळी केली.
शालेय पोषण आहारातील मालाच्या वाहतुकीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला चार दिवसात पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली. तीसुद्धा परिपत्रकाच्या माध्यमातून. ही बाब फडणवीस यांनी पुराव्याच्या माध्यमातून समोर आणली. कोणत्या व्यक्तीसाठी कोट्यवधी रुपयांची ही निविदा बेकायदेशीरपणे थांबविण्यात येत होती याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
आदिवासी विभागातही याच पद्धतीचा कारभार सुरू आहे, असे सांगत आधिकाऱ्यांच्या पातळीवर सुरू असलेल्या खरेदीचा सारा लपशील फडणवीस यांनी सभागृहाला सादर केला. या दोन्ही विभागातील गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.