भारत अगेस्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील हे भिडे गुरुजींविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी पोलिस आयुक्तालयात आले होते. त्यावेळी बंडगार्डन पोलिसांनी संचारबंदी भंग केल्याचा गुन्हा पाटील यांच्या विरोधात दाखल केला.
देशात कुठेही, काहीही झाले की त्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणे, अर्ज करणे, पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणे आदी प्रकार करुन प्रसिद्धी झोतात येण्यासाठी धडपड करणारे अनेक महाभाग पुण्यात आहेत. हेमंत पाटील देखील नियमितपणे प्रसिद्धी पत्रक काढत असतात. मात्र, संचारबंदीच्या काळात आयुक्तालयात जाण त्यांच्या अंगलट आले आहे.
कोरोना विषाणूच्या साथीसंबंधी संभाजी भिडेगुरुजी यांची मुलाखत काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केली. त्याचा आधार घेत भिडे गुरुजींविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे पत्र घेऊन पाटील पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत गेले होते. पाटील आल्याची वर्दी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांना उपनिरीक्षक रवींद्र गोडसे व हवालदार डांगे यांनी दिली.
संभाजी भिडेंविरोधात महाराष्ट्र कोविड १९ अधिनियम कलम ६ प्रमाणे कायदेशीर कारवाई करुन अटक करण्याबाबत पत्र पाटील यांनी आणल्याचे तांबे यांना सांगण्यात आले. ही बाब संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये लागू होत नसल्याने शासनाच्या संचारबंदीचे उल्लंघन यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाटील यांच्यावर कारवाई करण्यास कळविण्यात आले. त्यानुसार हवालदार नवनाथ डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारत अगेस्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत बाबुराव पाटील (वय ५०, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.