विशेष प्रतिनिधी
नाशिक : “हिरवे हिरवे गार गालिचे” या अजरामर काव्यातून महाराष्ट्राच्या हरित मनावर राज्य करणाऱ्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या पत्नी पार्वतीबाई ठोमरे यांनी परिचारिकेची सेवा बजावून आपली उपजीविका केली.
बालकवींचे काव्य निसर्गिक चैतन्याच्या बहरीचे होते तरी जीवन मात्र हलाखीचे होते. त्यातच त्यांचे एेन तारूण्यात रेल्वे अपघातात दुर्दैवी निधन झाले. महाराष्ट्र बालकवींच्या काव्याला मुकला पण त्यांच्या पत्नीचा कोवळा संसार उघड्यावर आला. माहेरचे कोणी उरले नाही. सासरच्यांनी वाऱ्यावर सोडले. अशा स्थितीत त्यांच्या मदतीला आले, लक्ष्मीबाई टिळक आणि रेव्हरंड टिळक. त्यांनी पार्वतीबाईंना मदतीचा हात तर दिलाच पण शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी थोर समाजसुधारक रमाबाई रानडे यांच्या सेवासदनमध्ये काही काळ राहिल्या. सेवासदनचे कार्यवाह गोपाळराव देवधर, कवी गिरीश यांच्या सल्ल्याने आणि मदतीने सोलापूरला जाऊन पार्वतीबाई यांनी परिचारिकेचे प्रशिक्षण पूर्ण केले. १९२८ साली त्या खानदेशात जिल्हा बोर्डाच्या हॉस्पिटस, दवाखान्यांमध्ये नोकरीला लागल्या. खानदेशातल्या अंमळनेर, चोपडा, जळगाव, शहादा आदी शहरांमध्ये त्यांचा सेवा काळ गेला.
१९५८ साली भडगाव येथे त्या निवृत्त झाल्या. संसार सुरू होत असतानाच बालकवींचे निधन झाले होते. पदरी अपत्य नाही. नोकरी फिरतीची. त्यामुळे आयुष्याच्या अखेरीस त्या चोपड्याला येऊन एका देवळात राहात होत्या. चोपड्यातील इंजिनिअर टिल्लू आणि त्यांच्या पत्नी सुलभाताई यांनी अखेरच्या दिवसांमध्ये पार्वतीबाई यांची काळजी घेतली. अनेक मराठी साहित्यिकांनी देखील त्यांची नंतर दखल घेऊन चार हजार रुपयांचा फंड त्यांना कवी अनिल यांच्या हस्ते दिला होता.
पार्वतीबाई यांना जन्मसाल फक्त आठवत होते, १९०१. जन्म तारीखही त्यांना आठवत नव्हती. तशीच त्यांच्या निधनाची तारीखही आता कोणाला माहिती नाही…!!
आजच्या परिचारिका दिनानिमित्त पार्वतीबाई यांचे स्मरण.
(ललित दिवाळी अंक १९७८ : रवींद्र पिंगे यांच्या आठवणींवर आधारित)