वृत्तसंस्था
इस्लामाबाद : मी जेव्हा भारताविरोधात खेळत होतो, तेव्हा त्यांची फलंदाजी आमच्यापेक्षा तगडी होती. पण ती फक्त कागदावरच. कारण आमच्या फलंदाजांनी 30-40 धावा केल्या तरी त्या संघासाठी असत. भारतीय फलंदाजांनी शतकं ठोकली तरी ती स्वतःसाठी असायची. भारत आणि पाकिस्तान या दोन संघातला फरक हाच असायचा, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि आपल्या काळातील उत्कृष्ट फलंदाज इंझमाम उल हक याने व्यक्त केले.
पाकिस्तानचा माजी सलामीवीर रमीझ राझा याला दिलेल्या यु-ट्यूब मुलाखतीत इंझमाम बोलत होता. देशाऐवजी स्वतःसाठी खेळण्याच्या या वृत्तीमुळेच आमच्या काळात आम्ही भारताला मात देण्यात सातत्याने यशस्वी झालो, असे इंझमाम म्हणाला. अर्थातच नेटकऱ्यांना इंझमामचे मत पसंत पडलेले नाही. सन 1992 पासून ते 2019 पर्यंतच्या सगळ्या विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारल्याचे दाखले नेटकऱ्यांनी इंझमामला दिले आहेत. विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमधल्या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेतल्या या सलगच्या पराभवांमध्ये इंझमामही सहभागी राहिलेला आहे.
इंझमामने इम्रान खानचेही या मुलाखतीत कौतुक केले. तो म्हणाला की, इम्रान हा फार तंत्रशुद्ध किंवा डावपेच रचण्याची क्षमता असणारा कर्णधार नव्हता. पण तरीही तो एक सर्वाधिक यशस्वी आणि आदर मिळवणारा कर्णधार होऊ शकला. कारण तो नेहमीच त्याच्या खेळाडुंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. खेळाडुंचा आत्मविश्वास वाढवून त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी कशी काढून घ्यायची हे त्याला माहिती होतं.
1992 च्या विश्वचषकादरम्यान इंझमाम त्याच्या गुणवत्तेला न्याय देणारी खेळी करु शकला नव्हता तेव्हा इम्रानने त्याला कसे प्रोत्साहन दिले याची आठवण इंझमामने सांगितली. इम्रानने त्याच्यावरचा विश्वास कायम ठेवत त्याला प्रत्येक सामन्यात खेळवले. परिणामी याच इंझमामने न्युझीलंडविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात 37 चेंडूत साठ धावांची स्फोटक खेळी करत पाकिस्तानचं विश्वचषकातलं आव्हान कायम ठेवलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यातही इंझमामंनं 35 चेंडूत केलेल्या 42 धावा महत्वाच्या ठरल्या होत्या. खराब कामगिरी झाली तरी इम्रान लगेच संघातून वगळत नव्हता. तो दीर्घ संधी द्यायचा म्हणूनच खेळांडुंना त्याच्याबद्दल आदर होता, असे इंझमाम म्हणाला.
भारतीय फलंदाजांवर मात्र इंझमामने स्वार्थीपणाचा आरोप केला. भारतीय खेळाडू हे संघासाठी नसून स्वतःच्या विक्रमांसाठी, स्वतःसाठी धावा बनवायचे. आम्ही पाकिस्तानी मात्र 30-40 धावा काढल्या तरी त्या मागं संघाचं हित असायचं, असा दावा इंझमामने केला. नेटकऱ्यांनी इंझमामचा हा दावा खोडून काढला. भारतीय संघाने दोनदा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला. दोनदा अंतिम फेरी गाठली. तीनदा उपांत्य फेरी गाठली. टी-ट्वेन्टी विश्वचषक भारताने जिंकला.
कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानपेक्षा चांगली कामगिरी भारताने केली. या तुलनेत पाकिस्तानी खेळाडूंनी देशासाठी काय केले, असा प्रश्न इंझमामला विचारण्यात आला आहे. मॅच फिक्सींगच्या आरोपामध्ये सर्वाधिक पाकिस्तानी खेळाडू रंगेहाथ पकडले गेले, चेंडू कुरतडणे, चेंडू खराब करणे असल्या गैरकृत्यांमध्ये पाकिस्तानी गोलंदाज सर्वाधिक आहेत, त्या पाकिस्तानने भारतीय खेळाडूंना शिकवू नये, असा सल्लाही नेटकऱ्यांनी इंझमामला दिला आहे.