- घरपोच दारु, दुध-भाजीपाल्यासाठी वणवण
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात शुक्रवार पासून घरपोच मद्यविक्री योजना सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी 5 हजार 434 मद्यप्रेमींनी या ऑनलाइन सेवेचा लाभ घेतला. विशेष म्हणजे यातले 4 हजार 875 मद्यप्रेमी फक्त नागपूर आणि लातूर या दोनच जिल्ह्यातले आहेत.
‘लॉकडाउन’मुळे जीवनावश्यक वस्तु मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांची एकीकडे त्रेधातिरपीट उडत असताना मद्यपींना मात्र घरबसल्या दारु मिळू लागली आहे. देशातले प्रगत राज्य म्हणवणार्या महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत गेल्या अवघ्या 2 महिन्यातच खडखडाट झाला आहे. त्यामुळे महसुलासाठी मद्यविक्रीला चालना दिली गेली आहे. दारु पिऊन राज्याच्या तिजोरीत भर टाकणार्या मद्यपींना सरकारने आता ‘कोरोना योद्धे’ म्हणावे, अशी टीका यातूनच सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
राज्यात देशी दारुची 4 हजार 159
दुकाने आहेत त्यापैकी 1 हजार 938 दुकाने सुरु आहेत. विदेशी मद्यविक्रीची (वाईन शॉप) 1 हजार 685 दुकाने आहेत त्यापैकी 530 सुरु होती. बिअर शॉप 4 हजार 947 आहेत, त्यातली 2 हजार 129 सुरु होती. म्हणजेच महाराष्ट्रातल्या एकूण 10 हजार 791 दारु दुकानांपैकी 4 हजार 597 सुरु झाली आहेत. दारु दुकाने सुरु झाल्यापासून राज्यात रोज हजारो लिटर दारु खपत आहे. त्यातून कोट्यवधी रुपये कर रुपाने शासनाच्या तिजोरीत येऊ लागले आहेत.