विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रातून वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले सुमारे 250 विध्यार्थी फिलिपिन्स देशात अडकले आहेत. यामध्ये पुण्यातील दोघी बहिणीचा समावेश असून आमची सुटका करा असे करून पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. एकूण 2 हजारावर भारतीय विद्यार्थी तेथे अडकले आहेत.
सिमरन गुप्ते या विध्यार्थीनीने हे पत्र लिहिले असून आपल्यावर आणि आपली बहीण सानिया यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे. फिलिपिन्समध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्त असल्याने भारतातून हजारो विध्यार्थी तेथे शिकण्यासाठी जात असतात. यातील बहुतांश विध्यार्थी मनिला येथे अडकले आहेत.
सिमरनने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “मी सिमरन गुप्ते आणि माझी बहीण सानिया आम्ही दोघीही फिलीपीन्स येथील लास पिनासमध्ये राहतो. या ठिकाणी मांडायचा आहे तो आहे की या ठिकाणी करोनाग्रस्तांची संख्या २३० झाली आहे. १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही साधारपणे २ हजार विद्यार्थी या ठिकाणी अडकून पडलो आहोत. या २ हजार विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५० विद्यार्थी हे महाराष्ट्रातील आहेत. आम्ही १८ आणि १९ मार्च रोजी भारतात येण्यासाठीची विमानाची तिकिटं बुक केली होती. फिलीपीन्स सरकारने आम्हाला ७२ तासांमध्ये देश सोडण्याची मुभा दिली होती. मात्र भारत सरकारने १७ मार्चला एक आदेश काढला ज्यानुसार ३१ मार्च पर्यंत १२ देशांमधल्या प्रवाशांना येण्यास मज्जाव केला आहे. फिलीपीन्स ब्लॅक लिस्टेड झाले आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी अडकून पडलो आहोत.”
“मनिला या शहरात १० मार्च ते १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतीय पासपोर्ट असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला आमच्याकडे १० ते १२ दिवस पुरेल इतके अन्न आणि पाणी आहे. मात्र त्यानंतर परिस्थितीला कसे सामोरं जायचं हा आमच्यापुढे असलेला प्रश्न आहे. फिलीपीन्समध्ये थांबणं हे अत्यंत ‘रिस्की’ वाटू लागलं आहे जेव्हा काही वेळासाठी इथली संचारबंदी शिथील केली जाते तेव्हा आमच्याकडे अन्नपदार्थ खरेदी करण्याचेही मर्यादित पर्याय आहेत. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करते की कृपा करुन लवकरात लवकर आम्हाला येथून सोडवा आणि भारतात आणा. तुम्हा सगळ्यांवर आमचा विश्वास आहे. तुम्ही आम्हाला या संकटातून सोडवाल अशी आशा आहे.”