- सहाशेहून अधिक कंपन्यांकडून एक कोटी उत्पादनाचा टप्पा लीलया पार. सध्या उत्पादन प्रतिदिन साडेचार लाख इतके
- भारतीय कंपन्यांकडे सध्या २.२२ कोटी पीपीई किटसच्या ऑर्डर
- सध्या सात हजार कोटी रूपयांची देशांतर्गंत बाजारपेठ; पण तब्बल ९२ अब्ज डाॅलर्सची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भारताला खुली. अमेरिका, युरोप व आशियाई प्रशांत विभाग हे भारताची नवी ‘डेस्टिनेशन्स’
सागर कारंडे
नवी दिल्ली : डाॅक्टर्स, नर्सेस यांच्यासाठी अतिशय आवश्यक असणारी एकही पीपीई किटस (व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे) आम्हाला केंद्र सरकारने पुरविले नसल्याचा अजब दावा (आणि धडधडीत खोटा) उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातील सरकार करीत असताना भारतीयांची मान उंचाविणारी कामगिरी पीपीई उत्पादक कंपन्यांनी केली आहे. केवळ साठ दिवसांतच तब्बल एक कोटी पीपीई किट्सचे उत्पादन करून भारत हा जगातील दुसरया क्रमाकांचा उत्पादक बनला आहे. म्हणजे भारत केवळ आत्मनिर्भरच झाला नाही; तर जगातील कोरोना योद्धांची काळजी घेणारा विश्वसनीय ब्रँड होतो आहे!
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखाली पीपीई किटस उत्पादक कंपन्यांनी अभूतपूर्व झेप घेतली आहे. ३० मार्च २०२० पर्यंत भारतात फक्त प्रतिदिन साडेतीन हजार पीपीई किट्स बनत होते; पण पाहता पाहता २५ मे पर्यंत ही उत्पादक क्षमता साडेचार लाख प्रतिदिन एवढ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे भारताने एक कोटी उत्पादनाचा टप्पा लीलया गाठला आहे. विशेष या क्षणाला भारताकडे १५ लाखांहून अधिक किटसचा साठा राखीव असून भारतातील सहाशे कंपन्यांना तब्बल २.२२ कोटी किटसच्या ऑडर्स मिळालेल्या आहेत.
निर्यातीला प्रचंड संधी
सध्या देशातील बाजारपेठ ७००० हजार कोटींची आहे. देशाला आवश्यक अशा किटसचे उत्पादन क्षमता विकसित झाली असून भारताला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुणावू लागली आहे. सध्या ५० अब्ज डाॅलर्सची ही बाजारपेठ तीन-चार वर्षांमध्येच तब्बल ९२ अब्ज डाॅलर्स होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अमेरिका, युरोप आणि प्रशांत आशियायी देशांमध्येच तब्बल ८० टक्के बाजारपेठ आहे. भारतासाठी ही मोठी संधी असेल. सध्या पीपीई किटसमध्ये चीन हा पहिल्या क्रमाकांचा उत्पादक आणि निर्यातक आहे. भारत उत्पादनात दुसरया क्रमाकांचा देश बनला आहे; पण अद्यापही निर्यातबंदी आहे. पण ज्यावेळेस चीनी व्हायरसचे संकट कमी होईल आणि विस्फोटाच्या सर्व शक्यता गृहीत धरूनही धोरणात्मकदृष्ट्या पुरेसा साठा तयार होईल, तेव्हा भारत निर्यात सुरू करू शकेल. त्यावेळेला ९२ अब्ज डाॅलर्सच्या या बाजारपेठेवर कब्जा मिळविण्यासाठी भारतीय कंपन्यां चीनला चांगलीच टक्कर देऊ शकतील.
महाराष्ट्र सरकारच्या दाव्याने धक्का
या पीपीई किटसमध्ये सर्जिकल मास्क, ग्लोव्ह्ज, गाऊन्स, हेड कव्हर, गाॅगल्स, फेस शिल्ड्स (चेहरयासाठी आवरण) आणि शू कव्हर आदींचा समावेश असतो. सगळ्या राज्यांना लागणारे हे पीपीई किटस, एन ९५ मास्क आदींचा पुरवठा केंद्र सरकारकडूनच होत आहे. आतापर्यंत केंद्राने महाराष्ट्राला जवळपास दहा लाख पीपीई किट्स आणि १६ लाखांहून अधिक एन ९५ मास्क दिलेले आहेत. शिवाय याव्यतिरिक्त खरेदी करण्यासाठीही केंद्राने सर्व राज्यांना निधी दिलेला आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारने आम्हाला केंद्राने एकही पीपीई किटस दिलेले नसल्याचा दावा केला आहे. त्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. “महाराष्ट्र सरकार इतके धडधडीत खोटे कसे काय बोलू शकते? सत्य आहे, केंद्राने सर्वाधिक आरोग्य साह्य महाराष्ट्राला केलेले आहे. तरीसुद्धा ते असे म्हणत असेल तर धक्कादायक आहे,” असे ते सूत्र म्हणाले.