चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळात महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे भंजाळले असल्याचा आरोप होत आहे. आता तर माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील महाविकास आघाडीचे एक शिल्पकार पृथ्वीराज चव्हाण यांनीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंंकडे प्रशासकीय कौशल्य नसल्याचे म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळात महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे भंजाळले असल्याचा आरोप होत आहे. आता तर माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील महाविकास आघाडीचे एक शिल्पकार पृथ्वीराज चव्हाण यांनीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंंकडे प्रशासकीय कौशल्य नसल्याचे म्हटले आहे.
पुण्यातील पत्रकारांशी आॅनलाईन चर्चासत्रात चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले, संकटाच्या काळात नेत्यांचे खरे नेतृत्व दिसते. मात्र सध्याच्या परिस्थितीत नेत्यांमध्ये प्रशासकीय कौशल्याचा अभाव दिसत आहे. परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाचा विषय असो की मुंबईतील परिस्थिती योग्यरित्या हाताळण्याची गरज आहे.
मुंबईत दररोज कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढत होत आहे. धारावीसारख्या दाट लोकसंख्येच्या भागात संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी अधिक काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या परिस्थितीत संसर्ग रोखण्यास प्राथमिकता देण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ प्रशासकीय अधिकार्यांवर अवलंबून राहून चालणार नाही.
चव्हाण म्हणाले, संकटाच्या काळात प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे. जबाबदार नेतृत्व म्हणून काम करताना प्रशासकीय कौशल्ये बाळगायला हवीत. मात्र या संकटाचा सामना करताना सध्या राजकीय नेतृत्व दिसत नाही.
संकटात नेतृत्व म्हणून काम करताना प्रशासकीय अधिकार्यांना कामाला लावून त्यांच्याकडून काम करून घेण्याचे कौशल्य असते. ते कौशल्य राजकीय नेतृत्वाकडे असायला हवे. हे संकट इतक्यात संपेल असे वाटत नाही. अशावेळी त्याच्यासोबत जगण्याची आपण तयारी करायला हवी. अर्थचक्र चालू झाले पाहिजे, यावर सर्वांचे एकमत आहे. मात्र कोरोनापासून काळजी घेण्यासाठी एक जीवनशैली आपल्या सर्वांना यापुढे आत्मसात करावी लागणार आहे.
चव्हाण यांनी उध्दव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर टीका केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चव्हाण हे दिल्लीतील कॉंग्रेस श्रेष्ठींच्या विश्वासातील मानले जातात. त्यामुळे चव्हाण यांच्या टीकेमुळे दिल्लीतील कॉँग्रेसचे नेते महाविकास आघाडीच्या कामावर खुश नाहीत, असा होत आहे. कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी सध्या केंद्र सरकारविरुध्द आक्रमक झाले आहेत.
मात्र, चीनी व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. परप्रांतिय कामगारांच्या स्थलांतराचा प्रश्न सर्वाधिक असंवेदनशीलतेने महाराष्ट्रातच हाताळला गेला अशी टीका होत आहे. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारवर टीका करताना त्यांना अडचणी येत आहेत.