- पीपीई किट्सचे उत्पादन ३३०० प्रतिदिनांवरून थेट तब्बल १.८६ लाखांवर
- एन ९५ मास्कचे उत्पादन प्रतिदिन ६८ हजारांवरून २.३० लाखांवर
- या गरूड भरारीमुळेच आतापर्यंत राज्यांना १९.२२ लाख पीपीई किटस आणि ५२ लाख एन ९५ मास्क पुरविण्यात केंद्राला यश
सागर कारंडे
नवी दिल्ली : एकीकडे चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावाचे आकडे वाढत असताना वैद्यकीय तयारीच्या आघाडीवर एक चांगली बातमी आली आहे. डाॅक्टर्स, नर्सेस आदींसाठी अत्यावश्यक असलेल्या व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे (पीपीई किट्स) आणि एन ९५ मास्कच्या निर्मितीमध्ये भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेने झेपावतो आहे. पीपीई किटसच्या उत्पादनामध्ये तर तब्बल पन्नासपट वाढ झाली आहे…
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी ही दिलासादायक माहिती दिली. जेव्हा चीनी व्हायरसच्या संकटाने अक्राळविक्राळ धारण करण्यास सुरूवात केली होती, तेव्हा त्या अर्थाने भारत वैद्यकीयदृष्ट्या तयार नव्हता. डाॅक्टर्स, नर्सेस या योद्धांना चीनी व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी अत्यावश्यक असलेले पीपीई किट्स जवळपास नव्हतेच. ३० मार्च अखेरीस भारतामध्ये फक्त ३३०० किटस प्रतिदिन तयार होत होते. पण त्यानंतर केंद्र सरकारने झटापट लावले उचलून पीपीई किटसच्या उत्पादनामध्ये अक्षरशः गरूड झेप घेतली. ३० एप्रिलच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये प्रतिदिन तब्बल १ लाख ८६ हजार पीपीई किटस तयार होत आहेत.
होशियारपूर, विशाखापट्टणम, राजकोट, हैदराबाद, बंगळुरू आदी शहरे पीपीई किटस हब म्हणून पुढे येत आहेत. “या वाढलेल्या क्षमतेमुळेच केंद्र सरकारने आतापर्यंत १९ लाख २२ हजार पीपीई किटस राज्यांना पुरविलेले आहेत. यापुढे तर आणखी वेगाने पीपीई किटसचा पुरवठा होईल आणि कोणत्याही वैद्यकीय योद्धांना तुटवडा जाणवणार नाही,” असे सूत्रांनी सांगितले.
अशीच भरारी एन ९५ मास्कच्या उत्पादनामध्ये घेतलेली आहे. ३० मार्चच्या आकडेवारीनुसार, देशामध्ये दररोज ६८ हजार एन ९५ मास्क तयार होत होते, पण हीच क्षमता ३० एप्रिलरोजी २ लाख ३० हजारांच्यापुढे गेली. परिणामी आतापर्यंत राज्यांना ५२ लाख मास्क पुरविण्यात केंद्र सरकारला यश आले आहे.