विशेष प्रतिनिधी
मुंबई : येत्या 14 एप्रिलपर्यंत देशभर लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेतला आहे.
‘लॉकडाऊन’ पूर्वीच तिकीट रद्द केलेल्या आणि नियमानुसार पैसे कापून परतावा मिळालेल्या प्रवाशांनाही उरलेले पैसे परत करण्याचा निर्णय गोयल यांनी घेतला आहे. यामुळे देशातील हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
२१ मार्चपासून देशात एकही रेल्वे गाडी रुळावर आलेली नाही. येत्या १४ एप्रिलपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. कोरोना साथीचे संकट चिघळले तर या कालावधीत वाढ होण्याचीही भीती आहे. मात्र उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी किमान चार महिने, तीन महिने आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण केले होते. त्यातील काहींनी आरक्षण रद्द केले. हे आरक्षण रद्द करताना रेल्वेच्या नियमानुसार ‘रद्द शुल्का’ची आकारणी करण्यात आली आणि उर्वरित रक्कम प्रवाशांना देण्यात आली. आता कापून घेण्यात आलेले तिकिटाचे पैसेही परत दिले जाणार आहेत. त्यासाठी संबंधित प्रवाशांना अर्ज भरून द्यावा लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.