कोरोनाच्या कहरात भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला एका गोष्टीमुळे धास्ती वाटू लागली आहे. ती म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीची. या बैठकीत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत धडा शिकवण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. घर मे घुसके मारेंगे, अशी सडेतोड भाषा बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुर्वी सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. मोदी कितीही कठोर होऊ शकतात, याचा अनुभव पाकिस्तानने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर डोवाल यांच्या बैठकीकडे पाहिले जात आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काश्मीरमधील कारवायांची किंमत चुकवावी लागण्याच्या धास्तीने पकिस्तानची झोप उडाली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत (पीओके) वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पाकिस्तानला धडा शिकविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
भारताने आक्रमक धोरण स्वीकारल्याने पाकिस्तानी लष्कर धास्तावले आहे. भारत पीओकेबाबत काही तरी मोठी कारवाई करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी मिळून ही योजना तयार केली आहे.
अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, रॉ चीफ, आयबी चीफ, नॉर्दन आर्मी कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी, १५ कोर के जीओसी लेफ्टिनेंट जनरल राजू, १६ कोर कमांडचे लेफ्टिनेंट जनरल हर्ष गुप्ता यांच्यासह जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह देखील उपस्थित होते. 5 तासांच्या मॅरेथॉन बैठकीत जम्मू-काश्मीर तसेच नियंत्रण रेषेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. डोवाल यांना हिज्बुल कमांडर रियाज नायकू याला ठार केल्यानंतर काश्मीरमधील अतिरेक्यांविरूद्धच्या कारवाईविषयी माहिती देण्यात आली. डोवाल यांना खोऱ्यात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांची यादी देण्यात आली.
जैश-ए-मोहम्मदचे 25-30 दहशतवादी काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट रचू शकतात अशी माहिती अधिकाऱ्यांनी डोवाल यांना दिली. सर्व अधिकाऱ्यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांनी त्यांना सीमारेषेवरील माहितीच्या आधारे सांगितले की, पाकिस्तानने काश्मीरमधील पीओके आणि मोठ्या प्रमाणात नियंत्रण रेषेजवळील दुधाणियाल, शारदा आणि आठकाम येथे अतिरेक्यांचे प्रक्षेपण पॅड सक्रिय केले आहेत. दहशतवादी घुसखोरीचे षडयंत्र रचत आहे.