• Download App
    पाऊस दमदार पण पिके साधारण : 'राजा' तोच राहणार पण देशावर नैसर्गिक संकट येणार; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत | The Focus India

    पाऊस दमदार पण पिके साधारण : ‘राजा’ तोच राहणार पण देशावर नैसर्गिक संकट येणार; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : यंदा देशावर नैसर्गिक आपत्ती ओढवणार आहेत. पावसाळा दमदार असला तरी पीक परिस्थिती मात्र साधारण असेल. काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहे. मुंबई-दिल्लीतला ‘राजा’चं पद अढळ असेल पण त्याच्यावर ताण प्रचंड येईल. हे आहे यंदाच्या वर्षाचं भाकीत खान्देशातील भेंडवळ घटमांडणीनं केलेलं. ‘राजा’ची तिजोरी रिकामी होईल आणि देशावर आर्थिक अरिष्ट ओढवेल, असेही भाकीत आहे.

    देशाची संरक्षण व्यवस्था कणखर असली तरी शत्रू देशांच्या कारवाया थांबणार नाहीत. देशावर येणार्या नैसर्गिक आणि मानवी संकटांचा मुकाबला सर्वांना एकत्रितपणे करावा लागेल, असे भाकीत भेंडवळ घटमांडणीतून पुढे आले. यंदा ‘लॉकडाऊन’मुळे भेंडवळची पारंपरिक घटमांडणी फक्त चौघांच्या उपस्थितीत झाली. सोमवारी (ता. २७ एप्रिल) सकाळी ६ वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी या घटमांडणीचे भाकीत जाहीर केले.

    घटामध्ये ठेवलेल्या करव्यावरील पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी पूर्णतः गायब होती. त्यामुळे संपूर्ण विश्वात नैसर्गिक संकटे येतील, कुठे कृत्रिम-मानवी आपत्ती ओढवतील. परकीय शत्रूकडून घुसखोरी, दहशतवादी कारवाया यांचा त्रास सुरुच राहील. साथीच्या आजारांनी जग त्रस्त होईल. अनेक ठिकाणी महापूर येतील. अतिवृष्टी होईल. भूकंप, त्सुनामी सारखी संकटे देशावर येतील, असे भाकीत करण्यात आले.

    पावसाळ्याच्या चार महिन्यात भरपूर पाऊस पडेल त्यामुळे पाण्याची चिंता असणार नाही. मात्र पीक परिस्थिती साधारण असेल. कुलदेवतेचा प्रकोप यंदा देशावर आहे. जनमानसावर तसेच पिकांवरसुद्धा रोगराईचे कमी-अधिक प्रमाण राहील. चारापाण्याची टंचाई असणार नाही. संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. परंतु सैन्यावरचा ताण खूप वाढेल. या सर्व गोष्टींचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. देशाची आर्थिक तिजोरी रिकामी होऊन देशावर आर्थिक अरिष्ट ओढवण्याची शक्यता भाकीतात सांगण्यात आली.

    दरम्यान, दरवर्षी या घटमांडणीसाठी हजारो शेतकरी तसेच प्रसिद्धी माध्यमांची गर्दी असते. यंदा चीनी विषाणूच्या साथीमुळे या सर्वांना दुर ठेवण्यात आले होते. यंदा भेंडवळची घटमांडणी होणार नाही, असे महाराजांनी जाहीर केले होते. मात्र परंपरा खंडित होऊ नये म्हणुन ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करीत अक्षयतृतीयेला घटमांडणी झाल्यानंतर आज भाकीत जाहीर करण्यात आले.

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    भारत-पाक तणावात राफेल उत्पादक कंपनीचे शेअर्स वधारले; डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 2 आठवड्यांत 8% वाढले

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!