‘पहाटेच्या अंधारा’तील अजित पवार अजूनही संजय राऊतांच्या मानगुटीवर? ठाकरेंच्या राज्यपाल नियुक्तीवरून आठवले काॅंग्रसचे ‘निर्लज्ज’ राज्यपाल!
thefocus_admin 19 Apr 2020 1:27 pm 171
1983 मधील राज्यपाल ठाकुर
रामलाल यांचे स्मरण आता होण्यामागे राऊत यांना काही सुचवायचे आहे का, असा प्रश्न निर्माण होतो आहे. केवळ वीस टक्के आमदारांचे बहुमत असलेले अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे तर राज्यपालांच्या मनात नाही ना, अशी शंका राऊत यांना येते आहे. त्यामुळे ‘समझने वालोंको इशारा काफी है..’, असे म्हणत राऊत यांनी पुन्हा अजित पवारांकडे तर बोट दाखवले नाही ना, असेही बोलले जात आहे…
विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आपल्या ट्विटरपंट्टी बद्दल प्रसिद्ध आहेत. चालू राजकीय घडामोंडीरवर टि्वटरवर वेचक भाष्य करण्याचे कसब असणाऱ्यांमध्ये ते अव्वल आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल लवकर नियुक्ती करत नसल्याचे पाहून राऊत यांनी `राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!,` अशा दोन वेळी आज सकाळी लिहिल्या. त्यावरून आता अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत.
राज्यपाल हे ठाकरे यांची नियुक्ती करण्यापूर्वी काही कायदेशीर बाबी तपासून घेत आहेत, अशी माहिती पुढे येत आहे. त्यावरून शिवसेना नेते अस्वस्थ आहेत. कारण राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सहा महिन्यांपूर्वीच राज्यपाल नियुक्त दोन जागांसाठीची शिफारस फेटाळली होती. राज्यपालनियुक्त जागांचा कालावधी सहा महिन्यांसाठी राहिलेला असताना आता का नियुक्त्या करता, असा सवाल त्यांनी विचारला. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि आदिती नलावडे यांच्या नियुक्त्या रखडल्या. त्याच दोन जागांपैकी एका जागेवर ठाकरे यांची नियुक्ती झाली. राज्यपाल गर्जे आणि नलावडे यांचा निकष ठाकरेंना लावणार नाही ना, अशी शंका शिवसेनेला येत आहे. त्यातूनच राऊत यांनी आधी राज्यपालांनी संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. त्यानंतर आक्रमक होऊन थेट रामलाल यांची आठवण काढली.
रामलाल यांचे स्मरण झाल्यामुळे हे रामलाल कोण, अशा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. रामलाल हे काॅंग्रसचे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. ते 1957 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1962, 67, 77, 80 आणि 82 अशा पाच वेळा तो लोकसभेवर निवडून गेले. एवढेच नाही सुरवातीला ते 28 जानेवारी 1977 ते 30 एप्लि 1977 अशा छोट्या कालावधीसाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री देखील होते. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनले आणि पुन्हा 1980 ते 1983 या कालावधीसाठी पुन्हा मुख्यमंत्री बनले. त्यांची राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशमध्ये 15 आॅगस्ट 1983 रोजी नियुक्ती झाली. त्या वेळी तेथे तेलगू देसमचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते एन. टी. रामाराव यांची सत्ता होती. रामाराव हे एक वैद्यकीय उपचारांसाठी एक आठवड्यासाठी अमेरिकेला गेले. त्या काळात रामलाल यांनी सत्तेची उलथापालथ करून टाकली. त्यासाठी अर्थात दिल्लीतील बड्या काॅंग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी हे केले होते. इंदिरा गांधी या तेव्हा पंतप्रधान होत्या.
रामराव यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून असलेल्या एन. भास्करराव यांना रामलाल यांनी मुख्यमंत्री म्हणून नेमले. या भास्करराव यांना फक्त वीस टक्के सत्ताधारी आमदारांचा पाठिंबा होता. तरीही रामलाल यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. एन. टी. रामाराव हे परत आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपद काढून घेणे अन्यायकारक असल्याचे रामलाल यांना सांगितले. तसेच बहुमत सिद्ध करण्याचीही तयारी दाखवली. पण रामलाल यांनी ते काही ऐकले नाही. मूलतःच आक्रमक असलेल्या रामाराव यांनी मग रामलाल आणि काॅंग्रेसविरोधात रस्त्यावरील आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा वणवा इतका होता की त्यानंतर राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना रामलाल यांना राज्यपाल पदावरून हटवाले लागले आणि रामाराव पुन्हा मुख्यमंत्री झाले.
या रामलाल यांचे स्मरण होण्यामागे राऊत यांना काही सुचवायचे आहे का, असा प्रश्न निर्णाण होतो आहे. केवळ वीस टक्के आमदारांचे बहुमत असलेले अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे तर राज्यपालांच्या मनात नाही ना, अशी शंका राऊत यांना येते आहे. त्यामुळे समझने वालोंको इशारा काफी है, असे म्हणत राऊत यांनी पुन्हा अजित पवारांकडे तर बोट दाखवले नाही ना, असेही बोलले जात आहे. अजित पवार आणि भाजप यांच्यातील छुपी युती लपून राहिलेली नव्हती. पहाटेच्या अंधारात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होतीच. त्यामुळे अजित पवार हे आता महाराष्ट्राचे एन. भास्कर राव बनणार का, या प्रश्नाचे कोडे राऊत यांना पडले असावे