विशेष प्रतिनिधी
मुंबई : चीनी व्हायरस विरोधात लढ्यात पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी तब्बल २५ कोटी रुपये दान करणारा प्रसिध्द चित्रपट अभिनेता अक्षयकुमार व त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना हार्टफुलनेस इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावर आले आहेत.
देशावर आलेल्या कोणत्याही आपत्तीच्या वेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील मंडळी सर्वसामान्य लोकाच्या मदतीला नेहमीच धावून गेलेली आहेत. आताही चीनी व्हायरसचे संकट गहिरे होत असताना या साथीचा मुकाबला करण्यासाठी मदतीसाठी धावून आलेल्या कलावंतांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर आभार मानले आहेत.
इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रॅँडसने हा सूचकांक प्रसिध्द केला आहे. यामध्ये दुसर्या स्थानावर टी सिरीज या म्युझिक कंपनीचे मालक भूषणकुमार आहेत. त्यांनी ११ कोटी रुपये दान केले. अभिनेता कार्तिक आर्यन तिसर्या स्थानावर आहे. त्याने एक कोटी रुपये दान केले. तरीही कार्तिकची लोकप्रियता जास्त ठरली. सोशल मीडियावर सर्वप्रथम त्यानेच पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता.
माधुरी दीक्षित, भूमी पेडणेकर, आयुष्यमान खुराना, आलिया भट, करण जोहर आदी नामवंतांनी पंतप्रधान मदत निधीला सढळ हस्ते देणगी दिली आहे. ‘बाहुबली’फेम प्रभासने चार कोटी रुपये दिले आहेत. रणदीप हुड्डाने एक कोटी रुपयांची मदत केली आहे. तेलुगू अभिनेता पवन कल्याण यांनी दोन कोटी रुपये मदत निधीला दान केले आहेत.
तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही प्रत्येकी 50 लाखांची मदत करणार असल्याचे त्याने सांगितलं. याशिवाय पवन कल्याण यांचा पुतण्या रामचरणने 1 कोटी 40 लाख, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीने 1 कोटी आणि महेश बाबूने 1 कोटी रुपये दान केले आहेत. क्रिकेटर विराट कोहली, त्याची पत्नी अनुष्का शर्मा, रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या सूचकांकात सर्वात खाली आहेत. कारण त्यांनी मदतनिधीसाठी कोणतीही घोषणा केलेली नाही.