विशेष प्रतिनिधी
पुणे : “लॉकडाऊनमुळे नागरिकांना त्रास होत असेल. आपल्या गावात काय स्थिती आहे,” असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेदनकरवाडीच्या (चाकण) युवा सरपंच प्रियंका मेदनकर यांना विचारला.
“सातत्याने घरी असल्याने नागरिक कंटाळले आहेत. मात्र, आपण जे करत आहात ते जनतेच्या भल्याचे आहे,’’ असे उत्तर देत कोरोना विरूद्ध गावात केलेल्या उपाय योजनांची माहिती प्रियंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व राज्यातील सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यामध्ये संपूर्ण राज्यातून चाकणजवळील मेदनकरवाडीच्या (ता.खेड) सरपंच प्रियांका मेदनकर यांच्याशी सुमारे ६ मिनिटे त्यांनी संवाद साधला. यावेळी कोरोना प्रतिबंधासाठी गावात काय उपाय योजना केल्या जात आहेत, त्यांना काय अडचणी येत आहेत याचीही विचारपूस पंतप्रधानांनी केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आयुष्यात एकदा तरी भेटावे तसेच त्यांच्याशी संवाद साधावा अशी ईच्छा होती. ही इच्छा आज पुर्ण झाली. पंतप्रधानांशी संवाद साधतांना मनावर दडपण होते. आपण संवाद चांगल्या प्रकारे साधू शकू की नाही याबाबत शंका होती. मात्र, बोलणे सुरू झाल्यावर दडपण दुर झाले. गावातील प्रश्नासंदर्भात थेट पंतप्रधानांशी बोलणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आहे,” अशी प्रतिक्रीया सरपंच प्रियंका मेदनकर यांनी या संवादानंतर व्यक्त केली.
कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावात काय उपाययोजना केल्या, असे मोदी यांनी विचारले. त्यावर मेदनकर म्हणाल्या, औद्योगिक वसाहतीला गाव लागून असल्याने लोकांची मोठी वर्दळ असते. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. दिवसा आड विविध जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात येत आहे. यामुळे गर्दी कमी होते. लॉकडाऊनच्या काळात गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडून मास्क शिवून लोकांना मोफत वाटप करण्यात येत आहे.
विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दोन वेळा संपूर्ण गाव सॅनिटायझर केले आहे. घरोघरी साबण वाटप करून कोरोनाच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. गावातील महिलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सात हजार महिलांना सॅनिटायझर नॅपकिन वाटप करण्यात आले आहे.
मोदी म्हणाले, गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात येणा-या लहान मोठ्या वस्तू जैन पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही आमच्या पर्यंत विक्री करू शकता. तसेच शेतात पिकणारा शेतमालही यामधून विकता येऊ शकतो असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
सरपंच प्रियांका मेदनकर यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तुमच्या सारख्या सुशिक्षित लोकप्रतिनिधीमुळे गावांचा विकास चांगला होईल, असे मोदी यांनी सरपंचांना सांगितले. शेवटी प्रियंका मेदनकर यांनी कविता सादर करून लवकरच ही तणावपूर्ण परिस्थीती निवळेल असा आशावाद व्यक्त केला. या कवितेला पंतप्रधानांनी दाद दिली.
प्रियंका मेदनकर यांनी त्यांचे १० पर्यंतचे शिक्षण चाकणमध्ये पुर्ण केले. यानंतर त्यांनी पुण्यातील गव्हर्न्मेंट कॉलेजमधून हॉटेल अॅन्ड ट्रव्हल टुरीझमचा कोर्स पूर्ण केला. घरात राजकीय पार्श्वभूमी असल्याने प्रियंका यांना राजकारणात यायचे होते.
यामुळे त्यांनी २०१४ मध्ये पुण्यातील एमआयटी येथून मास्टर्स इन गव्हरनंन्स विषयात पदवी घेतली. या वर्षाच्या शेवटच्या वर्षात असतांना २०१५ मध्ये झालेल्या सरपंच निवडणूकीत गावातून त्या थेट निवडून आल्या. या काळात त्यांनी गावात विविध विकास कामे राबवीली आहे.