विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ एप्रिलला ९.०० मिनिटांच्या वीज बंद आवाहनाचा पॉवर ग्रीडला धोका नाही. वीज पुरवठा एकदम बंद झाला तरी वीज मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीचे (fluctuation) योग्य व्यवस्थापन करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रविवारी रात्री घडणाऱ्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. यात पॉवर ग्रीड आणि POSOCO (Power Operation System Corporation Limited) चे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी रविवारच्या वीज बंद परिस्थितीची तांत्रिक माहिती दिली. रविवारी रात्री ९.०० वाजता ९.०० मिनिटांसाठी संपूर्ण देशातील वीज बंद झाली की विजेची १५ गिगा वॉट मागणी घटेल. देशाच्या एकूण वीज पुरवठा क्षमतेच्या फक्त ४% मागणी घटलेली असेल. त्यामुळे वीज मागणी व पुरवठा यांचे व्यवस्थापन करावे लागेल आणि ते विना धोका शक्य आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊन काळात विजेच्या मागणीत सरासरी २५% घट झाल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. मोदींचे वीज बंद आवाहन अशास्रीय आहे. पॉवर ग्रीड बंद पडून वीज पुरवठा यंत्रणा कोसळेल. आजच्या तंत्रप्रगतीच्या युगात असली आवाहने करतात का, अशा दुगाण्या झोडण्या काम मोदींच्या आवाहनानंतर सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीला महत्त्व आहे.
भारताचे पॉवर ग्रीड तांत्रिकदृष्टीने अव्वल आहे. एकाच नियंत्रकाखाली एक देश एक पॉवर ग्रीड असल्याचा भारताला लाभ आहे. वीज मागणी आणि पुरवठा व्यवस्थापन यामुळे सुलभ होते. भारतात घरगुती वीज वापराची मागणी एकूण उत्पादनाच्या ३३% आहे. कृषी आणि औद्योगिक वापराची मागणी ५९% आहे. औद्योगिक वापराच्या विजेची मागणी आधीच कमी झालेली आहे. त्यातून घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत एकदम घट झाली तर ती पुन्हा सुरू करताना ग्रीडवर ताण येऊ शकतो, असे औद्योगिक क्षेत्रातून सांगण्यात येत होते. त्याची दखल घेऊन मागणी पुरवठा व्यवस्थापन करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.