लॉकडाऊनचे पहिले २१ दिवस संपल्यावर देशातील अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी गृह मंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालयाला २४/७ अॅक्टीव्ह केले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लॉकडाऊनचे पहिले २१ दिवस संपल्यावर देशातील अर्थव्यवस्थेचे गाडे पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी गृह मंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालयाला २४/७ अॅक्टीव्ह केले आहे.
चीनी व्हायरसचा सामना करण्यासाठी नियोजन आणि राज्यांशी समन्वय साधण्यासाठी अमित शहा यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्रालयाचे सतत काम सुरू आहे. मंत्रालयात रोजच बैठकांचा सिलसिला सुरू असून जवळपास २४ तास गृहमंत्रालय काम करत आहे. कुठल्याही राज्यात किंवा केंद्र शासित प्रदेशात कोणतीही समस्या कधीही निर्माण झाली तरी गृहमंत्रालयाकडून तातडीने मदत किंवा सहकार्य करण्यात येत आहे.
पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. काही ठराविक उद्योग सुरू करण्याचा केंद्रांचा प्रयत्न आहे. मुख्यत: देशातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक बंद झाली आहे. ही सुरू करण्यासाठी अमित शहा यांनी प्राधान्य दिले आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्वे संपूर्णत:, जशीच्या तशी पालन करण्याविषयी पत्र लिहिले आहे. या काळात सर्व मालवाहू ट्रक्सची(अत्यावश्यक आणि इतरसुद्धा) आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत अशी दोन्ही प्रकारची वाहतूक करण्यास परवानगी आहे. मालवाहतुकीसाठी वेगळ्या परमीटची किंवा परवानगीची गरज नाही. रिकामे ट्रक किंवा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील परवानगी आहे. कारण ते मालाची उचल करण्यासाठी जात असतील किंवा माल पोहोचवून परत येत असतील.
गृहमंत्रालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर देखरेख ठेवणं. आत्यावश्यक सुविधा आणि वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवणं. लॉकडाऊन घोषित होताच इतर राज्यांमधील हजारो मजुरांनी स्थलांतर सुरू केले होते. पण त्यांना रोखून त्यांच्यासाठी जेवणाची, राहण्याची आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत गृहमंत्रालयाकडून देखरेख ठेवली जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी आणि नित्यानंद राय हेही काम करत आहेत. गृहमंत्रालयाच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी सुट्टीच्या दिवशीही काम करत आहेत.
लघु आणि मध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या आणि पीठ, डाळी आणि खाद्य तेल यांसारख्या अत्यावश्यक सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना कोणताही त्रास होऊ नये. तसेच अत्यावश्यक आणि इतर गोदामे आणि शीतगृहांना देखील काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे, असे अमित शहा यांनी सांगितले आहे. हॉट स्पॉट आणि कंटेनमेंट एरिया वगळता या सूचना सर्व ठिकाणी लागू असतील, असे गहमंत्रालयाने सांगितले आहे.