लॉकडाऊनमुळे 130 कोटी लोक म्हणजेच एका अर्थाने 130 कोटी ग्राहक घरात बसून आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर देखील चिनी विषाणूचा धोका कायमच राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन खरेदी-विक्री, उद्योग-व्यवसायात डिजिटलचा वापर वाढवणार आहेत. हे लक्षात घेऊन संकटातून संधी शोधण्यासाठी डिजिटल क्रांतीचे पाईक व्हा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रत्येक संकट त्याच्याबरोबर संधी घेऊन येते. चीनी व्हायरस देखील वेगळा नाही. आता कोणत्या नवीन संधी आणि वाढीची क्षेत्रे उदयाला येतील याचे आपण मूल्यांकन करूया. कोविडनंतरच्या जगात भारत पुढे असायला हवा. आपली माणसे, आपले कौशल्य संच, आपली मूलभूत क्षमता या कामी कशा प्रकारे वापरली जाऊ शकते याबद्दल आपण विचार करूया. डिजीटल क्रांतीचे पाईक व्हा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे.
चीनी व्हायरसच्या प्रकोपामुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देश आहे. या संकटातही संधी शोधण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी नव्या उमेदीने आयुष्याकडे पाहण्याचे आवाहन केले आहे. तंत्रज्ञानाचा सर्वात परिवर्तनात्मक परिणाम अनेकदा गरीबांच्या जीवनात होतो.
या तंत्रज्ञानाने नोकरशाहीचा पदानुक्रम नाहीसा केला, मध्यस्थांना दूर केले आणि कल्याणकारी उपायांना गती देईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. घर हे नवीन कार्यालय आहे. इंटरनेट ही बैठकीची नवी जागा बनली आहे. मी देखील या बदलांशी जुळवून घेत आहे. अनेक बैठका, मग त्या मंत्रिमंडळातील सहकार्यांबरोबरच्या चर्चा असतील, अधिकारी आणि जागतिक नेत्यांबरोबर असतील, या सर्व बैठका आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असल्याचेही पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.
या काळात लोक ज्या पद्धतीने आपली कामे सुरु ठेवत आहेत त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. आपले चित्रपट कलाकार काही सर्जनशील ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून घरी राहण्याचा संदेश देत आहेत. आपल्या गायकांनी एक आॅनलाइन मैफिल केली. बुद्धिबळपटू डिजिटल बुद्धिबळ खेळले आणि त्या माध्यमातून कोविड-19 विरूद्ध लढ्यात योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
2014 मध्ये सत्तेवर आल्यावर भारतीयांना विशेषत: गरीबांना त्यांचे जनधन खाते, आधार आणि मोबाईल क्रमांकाशी जोडायला सुरवात केली. या नुसत्या जोडणीने केवळ भ्रष्टाचार आणि कमीशन मागणे जे अनेक दशके चालू होते तेवढेच थांबवले नाही तर सरकारला एका बटणाची कळ दाबून पैसे हस्तांतरित करायला देखील सक्षम बनवले. एका बटणाची कळ दाबल्यामुळे फाइल विविध पदांवरील व्यक्तींकडे जाणे बंद झाले आणि त्यामुळे अनेक आठवड्यांचा विलंब देखील टळला.
जगभरात बहुधा भारतातच अशा प्रकारची सर्वात मोठी पायाभूत सुविधा आहे. कोविड-19 च्या परिस्थितीत या पायाभूत सुविधेमुळे गरीब आणि गरजूना पैसे त्वरित हस्तांतरित करण्यात मोठी मदत झाली असून कोट्यवधी कुटुंबांना याचा लाभ झाला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
संकटाच्या काळातसुद्धा आपली कार्यालये, व्यवसाय आणि व्यापार जलद गतीने वाढू शकतात. डिजिटल पेमेंट्स स्वेच्छेने स्वीकारणे हे जुळवून घेण्याचे प्रमुख उदाहरण आहे. मोठ्या आणि लहान दुकानांच्या मालकांनी डिजिटल उपकरणांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे जे संकटाच्या काळात व्यापाराला जोडून ठेवतील. भारतात डिजिटल व्यवहारात उत्साहवर्धक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अनेक वैद्यकीय सल्लागारप्रत्यक्ष दवाखान्यात किंवा रुग्णालयात न जाता वैद्यकीय सल्ला देत आहेत. पुन्हा, हे एक सकारात्मक चिन्ह आहे. जगभरातील टेलिमेडिसिनला अधिक मदत करण्यासाठी आपण व्यवसाय मॉडेल्सचा विचार करू शकतो का? याचा विचार करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.