वृत्तसंस्था
सिक्कीम : कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात थेट न्यायमूर्तीनांच धडा दिल्याची घटना सिक्कीमच्या सीमेवर घडली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एका न्यायमूर्तीच्या वाहनालाही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने राज्याच्या सीमेवरुन परत पाठवले. कायद्यासमोर सगळे समान, हा धडा यातून नागरिकांना मिळाला.
लॉकडाउनमुळे देशात जिल्हाबंदी, राज्यबंदी आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची मुभा केवळ अत्यावश्यक सेवांनाच आहे. तरीही अनेकजण पदाचा गैरवापर करुन किंवा अन्य मार्गाने हे नियम तोडण्याचा प्रयत्न करतात.
न्यायमूर्ती भास्कर प्रधान यांनी त्यांच्या सिलिगुडी येथे असणाऱ्या कुटुंबियांना गंगटोकला आणण्यासाठी त्यांची कार्यालयीन गाडी पाठवली होती. यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाउनच्या काळात प्रवासासाठी आवश्यक असणारा पासही घेतला होता. न्यायमूर्ती प्रधान यांचा चालक गाडी घेऊन राज्याच्या सीमेवर पोहोचला. तेव्हा सीमेवर असणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी न्यायमूर्तींची कार अडवली. चालकाने गाडी थांबवल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याने चौकशी केली. तेव्हा त्याने न्यायमूर्ती प्रधान यांच्या कुटुंबाला आणण्यासाठी निघालो असल्याची माहिती दिली. मात्र उपविभागीय अधिकारी प्रेम कमल राय यांनी हे ऐकल्यानंतरही वाहनचालकाला परत फिरण्यास सांगितले. तेव्हा चालकाने न्यायमूर्ती प्रधान यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा न्यायमूर्तींनीही समजंस भूमिका घेत सीमेवरील अधिकाऱ्याचे ऐकण्याची सूचना चालकाला केली आणि परत फिरण्यास सांगितले. ‘फ्री प्रेस जर्नल’ने या घटनेचे वार्तांकन केले आहे.
फ्री प्रेस जर्नलच्या प्रतिनिधीने उपविभागीय अधिकारी राय यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा राय यांनी सांगितले की, रंगपो चेकपोस्टवर कर्तव्यावर असताना न्यायमूर्तींचे वाहन आले. त्यावेळी मी वाहनचालकाची चौकशी केली. न्यायमूर्तींच्या कुटुंबांला आणण्यासाठी निघालो असल्याचे त्याने सांगितले. मात्र सिक्कीमची सीमा ओलांडण्याची परवानगी एकाही वाहनाला नाही. त्यामुळे परत फिरण्याची सूचना मी चालकाला केली. त्यावर त्याने न्यायमूर्तींना याबद्दल फोन केला. तेव्हा त्यांनीही वाहन चालकाला परत येण्याची सूचना केली.