विशेष प्रतिनिधी
चंदीगड : कोरोना लॉकडाऊनच्या काळात नांदेडच्या तख्त हुजूर साहेब गुरुद्वारात अडकलेल्या ३५०० भाविकांना महिनाभराच्या प्रयत्नांनंतर पंजाब सरकारने पंजाबमध्ये आणले त्यापैकी ९ भाविक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात असताना या भाविकांची कोरोना चाचणी झाली नाही यावरून महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारविरोधात संतापही व्यक्त करण्याय येत आहे.
३५०० पैकी ९० भाविकांना घेऊन एक बस पंजाबमध्ये पोहोचली. या सर्व भाविकांना वेगळे ठेवून त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात हे ९ भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
कोरोनाग्रस्त ९ भाविकांपैकी ६ भाविक तरणतारण जिल्ह्यातील आहेत तर उरलेले ३ भाविक कपूरथळा जिल्ह्यातील आहेत. तरणतारण जिल्हा ग्रीन झोनमध्ये असताना तेथील ६ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडणे ही पंजाब सरकारची डोकेदुखी वाढविणारी बाब ठरली आहे. तरणतारण जिल्ह्याचा ग्रीन झोनमधून बाहेर काढून ऑरेंज झोनमध्ये समावेश करावा लागला आहे. त्यातही ६ पैकी ५ भाविक सूर सिंह या एकाच गावातील असल्याने गाव आणि परिसर सील करावा लागला आहे.
पंजाबच्या अमरिंदर सिंग सरकारने कोरोना हॉस्पिटलमधील सुविधा पुरेशा वाढविलेल्या नाहीत, असा आरोप अकाली दलाने केला आहे, तर त्याला उत्तर देताना काँग्रेसने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. नांदेडमध्ये असतानाच सर्व भाविकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असत्या तर त्यांच्यावर तेथेच क्वारंटाइन करून उपचार करता आले असते. पण महाराष्ट्र सरकारने चाचण्याच केल्या नाहीत, असा आक्षेप पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनी घेतला.